कुपवाड ड्रेनेज प्रकल्पाचा २१३ कोटींचा आराखडा सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST2021-07-01T04:19:40+5:302021-07-01T04:19:40+5:30
सांगली : बहुचर्चित कुपवाड ड्रेनेज योजनेचा प्रकल्प अहवाल बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेकडे सादर केला. योजनेवर २१३ कोटींचा खर्च ...

कुपवाड ड्रेनेज प्रकल्पाचा २१३ कोटींचा आराखडा सादर
सांगली : बहुचर्चित कुपवाड ड्रेनेज योजनेचा प्रकल्प अहवाल बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिकेकडे सादर केला. योजनेवर २१३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. येत्या महासभेत प्रकल्प आराखडा मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. त्यानंतर तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल, असे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कुपवाड ड्रेनेज योजनेला खऱ्या अर्थाने गती आली. पालकमंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व आघाडीतील नेत्यांच्या उपस्थितीत २५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत कुपवाड ड्रेनेज योजनेवर चर्चा होऊन प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मिरज ड्रेनेज योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याने कुपवाड ड्रेनेज योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेसाठी २१३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात पाईपलाईनची एकूण लांबी २७० किलोमीटर आहे.
कुपवाड ड्रेनेजसाठी नगरोत्थान योजना, जलशक्ती अभियान, अमृत योजनेतून निधीसाठी पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. येत्या महासभेत प्रकल्प आराखड्याला मान्यता घेतली जाईल. या योजनेची तांत्रिक तपासणी मंडळ कार्यालयाकडून होईल. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता यांच्याकडे तांत्रिक मंजुरीसाठी सादर होणार आहे. ही योजना २०२३ मध्ये कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचेही सूर्यवंशी म्हणाले.
यावेळी उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, नगरसेवक विष्णू माने, संतोष पाटील, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी ए. ए. पाटील उपस्थित होते.
चौकट
सांगली-मिरजेतील वंचित भागाचा समावेश
सांगली व मिरज शहरासाठी स्वतंत्र ड्रेनेज योजनेचे काम सुरू आहे. या योजनेत आरवाडे पार्क, अभयनगर, मिरजेतील कोल्हापूर रोड परिसरातील अनेक नागरी वस्तींचा समावेश केलेला नव्हता. कुपवाडच्या आराखड्यात या वंचित भागाचाही समावेश करण्यात आला आहे. या भागात ३१ किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. त्यासाठी अंदाजे खर्च १५ कोटी रुपये अपेक्षित असल्याचे महापौर सूर्यवंशी म्हणाले.
चौकट
योजनेची वैशिष्ट्ये
* कुपवाड ड्रेनेज योजना : २१३ कोटी रुपये
* एकूण पाईपलाईन : २७० कि.मी.
* संप व पंपगृह : अहिल्यानगर, तुळजाईनगर, कुंभारमळा येथे.
* मलशुद्धीकरण केंद्र : कुंभारमळा (वानलेसवाडी)
* प्रक्रिया केलेल्या पाण्याची विल्हेवाट : मिरज-कोल्हापूर रस्त्याजवळील ओढ्यातून सोडले जाणार