सोने देण्याच्या बहाण्याने महिलेस २१ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:25 IST2021-02-07T04:25:23+5:302021-02-07T04:25:23+5:30
सांगली : शहरातील वारणाली येथील महिलेस सोने देण्याच्या आमिषाने २० लाख ९० हजारांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी संगीता ...

सोने देण्याच्या बहाण्याने महिलेस २१ लाखांचा गंडा
सांगली : शहरातील वारणाली येथील महिलेस सोने देण्याच्या आमिषाने २० लाख ९० हजारांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी संगीता राजाराम जाधव यांनी दीपा ऊर्फ सई सुनील पाटील (ज्ञानेश्वर कॉलनी, वारणाली, सांगली) या महिलेविरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संजयनगर पोलिसांत संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वारणाली परिसरात फिर्यादी संगीता जाधव आणि संशयित दीपा पाटील शेजारी-शेजारी असल्याने दोघींची ओळख होती. संशयित पाटील हिने जाधव यांना सोने व्यवहाराचे काम करत असल्याचे सांगून सोने देण्याच्या आमिषाने वेळोवेळी वीस लाख ९० हजारांची रक्कम घेतली.
पैसे घेतल्यानंतर चार दिवसांत पैसे परत देतो, असेही संशयित महिलेने सांगितले होते. काही कालावधी गेल्यानंतर जाधव यांनी त्यांना पैसे मागितले असता, ती टाळाटाळ करू लागली. वारंवार पैशाची मागणी करताच, संशयित महिलेने पैसे देण्यास नकार देत, आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचेही जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. नोव्हेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० या वर्षभराच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. वारंवार मागूनही पैसे न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जाधव यांनी शनिवारी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दीपा ऊर्फ सई सुनील पाटील हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील पुढील तपास करत आहेत.