जिल्ह्यातील २१ आरोग्य सेविका सेवेतून मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:21+5:302021-09-02T04:56:21+5:30
सांगली : उपकेंद्र इमारतीमध्ये वर्षभरात प्रसुती झाल्या नसल्याचे कारण देत जिल्ह्यातील २१ आरोग्य सेविकांना सेवेतून कमी केले आहे. याविरोधात ...

जिल्ह्यातील २१ आरोग्य सेविका सेवेतून मुक्त
सांगली : उपकेंद्र इमारतीमध्ये वर्षभरात प्रसुती झाल्या नसल्याचे कारण देत जिल्ह्यातील २१ आरोग्य सेविकांना सेवेतून कमी केले आहे. याविरोधात सेविकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. उपकेंद्राची इमारत योग्य नसल्याने आरोग्य केंद्रात प्रसुती केल्याचा दावा सेविकांनी केला आहे.
निवेदनात म्हटले की, जिल्ह्यात २००५ मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अधिकारी व कर्मचारी विविध पदावर गाव, तालुका, जिल्हा स्तरावर मागील १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाही आरोग्य सेविकांनी नियमितपणे काम केले आहे. मात्र, या पदांना अचानक वेतन मंजूर न झाल्याचे कारण देत सेविकांना कामावरुन कमी केले आहे. काही सेविकांवर प्रसुती कमी झाल्याचा ठपका ठेवला आहे. उपकेंद्र स्तरावरील सुविधांचा विचार करता तेथे प्रसुती करणे धोक्याचे वाटते. केवळ उपकेंद्र प्रसुती करणे हीच आरोग्य सेवा नव्हे. जिल्ह्यातील ९९ टक्के प्रसुती रुग्णालयांतच केल्या जातात. त्यामुळे उपजत मृत्यू व माता मृत्यू टाळता आले. प्रशासनाने कारवाई मागे घ्यावी.
चौकट
सोमवारपासून उपोषण
कंत्राटी २१ आरोग्य सेविकांना चार दिवसात कामावर न घेतल्यास दि. ६ सप्टेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण करु असा इशारा आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, कार्याध्यक्ष शांताराम कुंभार यांनी दिला आहे. यावेळी आर. ए. पाटील, व्ही. पी. कांबळे, ए. व्ही. वायदंडे, आर. के. कांबळे, जे. एस. चौगुले, निता थोरात उपस्थित होत्या.