‘टेंभू’च्या कामांसाठी २0१७ ची ‘डेडलाईन’
By Admin | Updated: May 17, 2016 01:47 IST2016-05-17T01:27:00+5:302016-05-17T01:47:56+5:30
मुंबईत बैठक : निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री

‘टेंभू’च्या कामांसाठी २0१७ ची ‘डेडलाईन’
सांगली : टेंभू उपसा जलसिंचन योजनेची प्रस्तावित कामे मार्च २0१७ पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. उर्वरित कामे करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. टेंभूच्या उर्वरित कामांमधील अडचणींवर चर्चा करण्यासाठी मुंबईच्या सह्याद्री अतिथिगृहात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी खासदार संजय पाटील, आ. गणपतराव देशमुख व सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, टेंभू योजनेवर आजअखेर एक हजार ९३५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. २0१६-१७ साठी ८0 कोटींची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. टप्पा क्र. १ (अ), १ (ब), ३ (अ), ३ (ब) पूर्णपणे कार्यान्वित करणे बाकी आहे. टप्पा क्र. ४ आणि ५ ची उर्वरित कामेही पूर्ण करावीत. मुख्य कालव्याची ६५ किलोमीटर लांबी पूर्ण करण्यासाठी नियोजन झाले आहे. टेंभू येथे कृष्णा नदीवर धरण बांधून कृष्णा नदीतील पाणी पाच वेगवेगळ्या टप्प्यांद्वारे उचलून, सातारा जिल्ह्यातील ६00 हेक्टर, सांगली जिल्ह्यातील ५९ हजार ८७२ हेक्टर आणि सोलापूर जिल्ह्यातील २0 हजार हेक्टर, अशा एकूण ८0 हजार ४७२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेअंतर्गत ३५0 किलोमीटरचे कालवे असून, २0८ किलोमीटरपर्यंतची कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेचा लाभ सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील २१३ गावांना झाला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
यावेळी कार्यकारी संचालक एम. व्ही. पानसे, मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, कार्यकारी अभियंता अ. ल. नाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
या कामांना मंजुरी
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुरुवातीला टेंभू योजनेअंतर्गत असलेली इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल कामे प्राधान्याने केली जातील. त्यासाठी ३0 कोटी रुपयांची तजवीज केली आहे. यातून पंप, मोटारी व अन्य बंद पडलेली यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर उर्वरित निधीतून प्राधान्याने मुख्य कालव्यांची कामे करायची आहेत. त्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी २0१७ पर्यंतची मुदत दिली आहे.
शेतकऱ्यांकडून दुष्काळी मदत सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी जमविलेल्या एक लाखाच्या निधीचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.