कर्ज वाटपात २00 कोटींची भर
By Admin | Updated: October 22, 2015 00:52 IST2015-10-22T00:29:56+5:302015-10-22T00:52:51+5:30
नव्या धोरणाचा परिणाम : पीक कर्जात १0१ कोटींची वाढ

कर्ज वाटपात २00 कोटींची भर
सांगली : जिल्हा बँकेने २0१६-१७ या आर्थिक वर्षात पीक कर्जांच्या मर्यादेत वाढ केल्यामुळे कर्ज वाटपात एकूण १९७ कोटी ८६ लाख ९१ हजार रुपयांची भर पडणार आहे. गतवर्षाच्या पीककर्ज वाटपाच्या आकडेवारीवरून हा अंदाज काढण्यात आला असल्याने, यात आणखी वाढ होऊ शकते.
चालू वर्षाच्या तुलनेत २0१६-१७ साठीच्या कर्जमर्यादेत मोठी वाढ केली आहे. अनेक पिकांच्या कर्ज मर्यादेत दुप्पट, दीडपट वाढ झाली आहे. ज्या पिकांचा समावेश कर्जवाटप धोरणात नव्हता, त्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीला प्रोत्साहन व बळ देण्याचा प्रयत्न या योजनांच्या माध्यमातून होणार आहे. पिकांच्या यादीत वाढ झाली असून पुढील आर्थिक वर्षापासून झेंडू, शेवगा, संत्री, मोसंबी या पिकांनाही बँक कर्जपुरवठा करणार आहे. वाहन कर्जाच्या मर्यादेतही मोठी वाढ केली आहे.
एकूण कर्ज वाटपात उसाचे कर्ज ६५ टक्के, द्राक्षासाठी ३१ टक्के, तर उर्वरित कर्जवाटप अन्य पिकांसाठी केले जाते. उसाला यापूर्वी आडसाली, लागण, खोडवा, निडवा अशा पीक पद्धतीवर कर्जाची मर्यादा आखून दिली होती. संपर्क अभियानात शेतकऱ्यांनी गटनिहाय कर्जमर्यादेबद्दल तक्रारी केल्या. पिकाची पद्धत न पाहता उसाला सरसकट कर्जमर्यादा निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हेक्टरी १ लाख २५ हजार कर्ज दिले जाणार आहे. त्यामुळे उसाच्या माध्यमातून आगामी वर्षात १0१ कोटी ५७ लाख ५६ हजार रुपये वाढ होणार आहे. सध्या निर्यातक्षम द्राक्षांसाठी २ लाख २५ हजार, तर सर्वसाधारण द्राक्षासाठी २ लाख रुपये हेक्टरी कर्जवाटप केले जात होते. आता निर्यातक्षम द्र्राक्षासाठी ३ लाख २५ हजार, तर सर्वसाधारण द्राक्षासाठी ३ लाख रुपये हेक्टरी कर्जवाटप केले जाणार आहे. त्यामुळे द्राक्ष व इतर फळांच्या माध्यमातून आगामी वर्षात ९२ कोटी २६ लाख ४८ हजार रुपयांची वाढ शक्य आहे. चालू वर्षांच्या आकडेवारीवर वाढीचे गणित आखण्यात आले आहे. यात आणखी वाढ झाली, तर अडीचशे कोटींच्या वाढीचीही चिन्हे आहेत. कर्जवाटपात वाढ झाल्याने बँकेच्या उत्पन्नातही मोठी वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)