८८५ रुपयांच्या घरगुती सिलिंडरला २० रुपयांचे जादा चहापाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST2021-09-11T04:26:49+5:302021-09-11T04:26:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती आभाळाला भिडल्या असताना डिलिव्हरीसाठीदेखील पुन्हा जादा पैसे मोजावे लागत आहेत. ...

८८५ रुपयांच्या घरगुती सिलिंडरला २० रुपयांचे जादा चहापाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती आभाळाला भिडल्या असताना डिलिव्हरीसाठीदेखील पुन्हा जादा पैसे मोजावे लागत आहेत. डिलिव्हरी बॉयने जादा पैसे घेणे बेकायदेशीर असतानाही ते पैशांसाठी अडून बसतात. महागाईने हैराण असणाऱ्या ग्राहकांसाठी हा जादा भार डोकेदुखी ठरत आहे.
गॅस कंपन्यांच्या पावतीमध्ये सिलिंडर घरापर्यंत पोहोच करण्यासाठीचे पैसे नोंदविलेले असतात. सध्या ८८५ रुपयांना सिलिंडर मिळतो. त्यामध्ये सुमारे २७ रुपये हे घरपोहोच डिलिव्हरीसाठीचे असतात. तरीही ग्राहकाला जादा १५ रुपयांसह एकूण ९०० रुपये मोजावे लागतात. वरचे १५ रुपये म्हणजे डिलिव्हरी बॉयची टीप, खुशाली किंवा सिलिंडर दिल्याबद्दलचा मेहनताना ठरतो. पुढच्या खेपेला सिलिंडर वेळेत येणार नाही या भीतीने ग्राहकदेखील मुकाटपणे १५-२० रुपयांची टीप देतात. ग्राहकाने थेट एजन्सीमध्ये जाऊन सिलिंडर घेतल्यास त्याचे २७ रुपये वाचतील, पण गॅस कंपन्या आणि एजन्सी ही बाब ग्राहकांना सांगत नाहीत.
- सध्याचा गॅस सिलिंडरचा दर - ८८५ रुपये
- जिल्ह्यातील एकूण ग्राहक संख्या - ७००,०००
बॉक्स
वर्षभरात ३०० रुपयांची दरवाढ
१४.२ किलो वजनाचा घरगुती सिलिंडर वर्षभरात ३०० रुपयांनी महागला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये तो ५८० रुपयांना मिळत होता. सध्या त्यासाठी ८८५ रुपये मोजावे लागत आहेत. सर्वसामान्यांसाठी ही दरवाढ आवाक्याबाहेरची ठरली आहे. गेल्या सहा महिन्यांत तर प्रत्येक महिन्याला दरवाढ सुरू आहे.
कोट
सिलिंडरसाठी जातात ९०० रुपये
सिलिंडरची ८८५ रुपयांची पावती डिलिव्हरी बॉय देतो. पैसे मात्र १५-२० रुपये जादाच घेतो. सिलिंडर ९०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने पाच रुपयांचाही विचार करावा लागत आहे.
- कीर्ती राजमाने, गृहिणी, सांगली.
सिलिंडर महाग झाला तरी डिलिव्हरी बॉयची टीप मात्र थांबलेली नाही. पावतीनुसार पूर्ण पैसे दिल्यानंतरही २० रुपये जादा घेतातच. ९०० रुपये दिल्यानंतर वरचे १५ रुपये परत मिळत नाहीत.
- रजनी शेटे, गृहिणी, सांगली.
कोट
जादा पैसे देण्याची आवश्यकता नाही
सिलिंडर डिलिव्हरीसाठी कामगारांना जादा पैसे देण्याची आवश्यकता नाही. जितके बिल, तितकेच पैसे द्यावेत. कामगाराने जादा पैशांसाठी सक्ती केली तर ग्राहक तक्रार करू शकतात. जादा दिले जाणारे पैसे म्हणजे ग्राहक आणि डिलिव्हरी बॉय यांच्यातील वैयक्तिक विषय ठरतो. काही ग्राहक अपार्टमेंटमध्ये चौथ्या, पाचव्या मजल्यावर राहतात. इतक्या उंचीवर सिलिंडर आणल्याबद्दल काही ग्राहक स्वत:हून १०-२० रुपये जादा देतात.
- अभयकुमार बरगाले, अध्यक्ष, महाराष्ट्र एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन.