इस्लामपुरात २0 कोटींचे अमली मेफेड्रॉन हस्तगत
By Admin | Updated: March 11, 2015 00:06 IST2015-03-10T23:09:24+5:302015-03-11T00:06:47+5:30
महसूल संचालनालयाच्या गुप्तवार्ता विभागाला ही माहिती मिळाल्यावर त्यांच्या पथकाने अत्यंत गोपनीयता पाळत ही कारवाई केली

इस्लामपुरात २0 कोटींचे अमली मेफेड्रॉन हस्तगत
इस्लामपूर : केंद्र शासनाच्या अमली पदार्थविरोधी महसूल संचालनालयाच्या पथकाने इस्लामपूर येथील औद्योगिक वसाहतीमधील ओंकार इंडस्ट्रीजच्या गोदामावर छापा टाकून अंदाजे २० कोटी रुपये किमतीचा ३४० किलो मेफेड्रॉन हा घातक अमली पदार्थ हस्तगत केला. सोमवारी रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती. येथील दोघांना पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अमली पदार्थांबाबतची एवढ्या मोठ्या रकमेची झालेली ही पहिली कारवाई ठरली. महसूल संचालनालयाच्या गुप्तवार्ता विभागाला ही माहिती मिळाल्यावर त्यांच्या पथकाने अत्यंत गोपनीयता पाळत ही कारवाई केली. कोंडुस्कर यांची ओंकार इंडस्ट्रीज नावाची कंपनी औद्योगिक वसाहतीमध्ये आहे. त्यांच्या गोदामात मेफेड्रॉन सापडले. १०—१२ दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी या गावात ३५ कोटी किमतीचे ५०० किलो मेफेड्रॉन सापडल्यानंतर आता त्याचे धागेदोरे इस्लामपूर शहरापर्यंत पोहोचल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले.
यापूर्वी कोंडुस्कर यांच्या कोल्हापूर, कुपवाड, सांगली येथील कार्यालय व गोदामांवर छापे टाकून कारवाई झाल्या आहेत. (वार्ताहर)