बहिर्जी नाईक समाधीस्थळासाठी २ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST2021-04-04T04:27:32+5:302021-04-04T04:27:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे नेतृत्व करणारे नरवीर बहिर्जी नाईक यांच्या बाणुरगड (ता. खानापूर) ...

बहिर्जी नाईक समाधीस्थळासाठी २ कोटींचा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे नेतृत्व करणारे नरवीर बहिर्जी नाईक यांच्या बाणुरगड (ता. खानापूर) येथील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली.
अनिल बाबर म्हणाले, बाणुरगड येथील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक आणि अनुयायांना विविध दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे या पर्यटन विकासाला निधी द्यावा, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. नरवीर बहिर्जी नाईक यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे समाधीस्थळ असलेल्या बाणुरगड भागाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी भरीव निधीची गरज होती.
आता यासाठी २ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून प्रामुख्याने बानुरगड ते समाधी स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी एक कोटी वीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता दर्जेदार होणार आहे. तसेच नरवीर बहिर्जी नाईक समाधी स्थळ परिसरात बगीचे, पेविंग्ज ब्लॉक व समाधी स्थळ परिसर सुशोभीकरण करण्यासाठी ५० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे समाधीस्थळ परिसरात सामाजिक सभागृह बांधकामासाठी ३४ लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे हा परिसर पर्यटनकेंद्र म्हणून विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला असून त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे सहकार्य लाभले असल्याचे आ. अनिल बाबर यांनी सांगितले.