सांगलीत गॅस्ट्रोचे १९ रुग्ण
By Admin | Updated: November 25, 2014 23:48 IST2014-11-25T23:09:24+5:302014-11-25T23:48:08+5:30
घरोघरी सर्व्हे सुरू : पाण्याचे नमुने तपासणी, औषध फवारणी सुरू

सांगलीत गॅस्ट्रोचे १९ रुग्ण
सांगली : मिरजेपाठोपाठ सांगलीतही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळू लागल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आतापर्यंत शहरात गॅस्ट्रोचे १९ रुग्ण आढळले आहेत. यातील १४ रुग्णांवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, हा साथीचा आजार पसरु नये, यासाठी आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्व्हे सुरु केला आहे. पाण्याचे नमुने घेऊन तपासणी, तसेच विविध भागात औषध फवारणी केली जात आहे.
शहरातील संजयनगर, अभयनगर, शंभरफुटी रस्ता, खणभाग, जमदाडे गल्ली, यशवंतनगर, माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर या परिसरात राहणाऱ्या काहीजणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. या १९ रुग्णांपैकी १४ रुग्णच रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरित चार रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून या रुग्णांना ताप, उलटी व जुलाबाचा त्रास सुरु होता. खासगी रुग्णालयात त्यांनी औषधोपचार घेतले. मात्र त्यांची प्रकृती खालावतच गेली. यामुळे ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले. मिरजेतही गेल्या चार दिवसांपासून गॅस्ट्रोच्या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत सातजणांचा बळी गेला आहे. अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सांगलीतही त्याची सुरुवात झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळत आहेत. दूषित पाण्याचा ग्रामीण भागात पुरवठा होत आहे. यामुळे ग्रामपंचायतीकडून गावात पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले जात आहे. शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर प्रथम अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना वॉर्डात हलविले जात आहे. शहरातील खासगी रुग्णालयातही ताप, उलटी व जुलाबाचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यांची माहितीही जिल्हा आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. कवलापूर, कवठेएकंद येथेही गॅस्ट्रोचे रुग्ण आढळत आहेत. (प्रतिनिधी)
जुलाब, उलट्या
चक्कर येणे,
डोळे खोलवर जाणे,
अंग थंडगार पडणे,
थंडी वाजून येणे
काय काळजी घ्यावी...
पाणी उकळून प्यावे
घर व परिसर स्वच्छ ठेवावा
विहीर व कूपनलिकेतील पाणी पिऊ नये
जुलाब, उलट्या झाल्यास तातडीने औषध घ्यावे
सांगलीत आज बैठकीचे आयोजन
महापालिका क्षेत्रामध्ये गॅस्ट्रो व कॉलऱ्याने गंभीर स्वरूप धारण केले असून, यावर उपाययोजना करण्यासाठी तातडीने उद्या (बुधवार) वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. या बैठकीत तातडीने उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.गेल्या आठ दिवसांपासून सांगली-मिरजेत गॅस्ट्रो-कॉलऱ्याने थैमान घातले आहे. सुमारे साडेतीनशेहून अधिक रुग्ण आढळले असून, चौघांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आज (मंगळवार) शासकीय रुग्णालय, मिरज व सांगली येथे भेट दिली. याबाबत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होत आहे.