माधवनगरला १९ लाखांची रोकड जप्त; शेतकरी ताब्यात
By Admin | Updated: November 17, 2016 23:54 IST2016-11-17T23:54:31+5:302016-11-17T23:54:31+5:30
उशिरापर्यंत चौकशी

माधवनगरला १९ लाखांची रोकड जप्त; शेतकरी ताब्यात
सांगली : दुधगाव (ता. मिरज) येथील सुभाष चवगोंडा पाटील या शेतकऱ्याच्या मोटारीतून १९ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. शहर पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांच्या पथकाने माधवनगर-कर्नाळ रस्त्यावर बुधवारी रात्री दहा वाजता ही कारवाई केली. याबाबत सुभाष पाटील यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यासंदर्भात गुरुवारी आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे.
सुभाष पाटील बुधवारी रात्री त्यांच्या मोटारीतून (एमएच १२ ईबी ९८९६) माधवनगरमार्गे कर्नाळला १९ लाखांची रोकड नेणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपअधीक्षक दीपाली काळे, संजयनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांच्या पथकाने माधवनगर-कर्नाळ रस्त्यावर सापळा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार संशयित मोटार रात्री दहा वाजता या मार्गावरून जाताना दिसून आली. पथकाने मोटार थांबवून झडती घेतली असता एका बॅगेत पाचशेच्या नोटांची १९ लाखांची रोकड मोटारीत सापडली. यामध्ये नोटांचे ३८ बंडल होते. ही रोकड जप्त करून पथकाने सुभाष पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.
ही रोकड पाटील यांनी शेती व्यवसायातील असल्याचा दावा केला आहे; पण यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पाटील यांना सोडून दिले आहे. तसेच त्यांची मोटारही परत केली आहे. मात्र रोकड जप्त करण्यात आली आहे.
केंद्र शासनाने गेल्या आठवड्यात हजार, पाचशेच्या नोटांवर बंदी घातली आहे. बाजारात चलनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असताना एकाचवेळी पाटील यांच्याकडे १९ लाखांची रोकड आली कोठून? याची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णकांत उपाध्याय यांनी संजयनगर पोलिसांना दिले आहेत.
गुरुवारी दुपारी पोलिसांनी ही रोकड जप्त केल्याच्या कारवाईची लेखी माहिती आयकर विभागाला दिली आहे. आयकर विभागाचे पथक येत्या एक-दोन दिवसांत संजयनगर पोलिस ठाण्यास भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू करणार आहे. नोटांवर बंदी घातल्यापासून शहरात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे. नोटांवरील बंदी, तसेच विधान परिषद, नगरपालिका निवडणुका असल्याने शहरासह जिल्ह्यात सातत्याने नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. (प्रतिनिधी)