सांगलीत १८५ मंडळांनी दिला बाप्पाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:32 IST2021-09-17T04:32:16+5:302021-09-17T04:32:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी शहरातील १८५ सार्वजनिक मंडळांनी गणरायाला निरोप दिला. घरगुती उत्सवाच्या मूर्तींचेही कृष्णा ...

सांगलीत १८५ मंडळांनी दिला बाप्पाला निरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी शहरातील १८५ सार्वजनिक मंडळांनी गणरायाला निरोप दिला. घरगुती उत्सवाच्या मूर्तींचेही कृष्णा नदीत विसर्जन झाले.
विसर्जनासाठी कृष्णाकाठी गणपती घाटावर दुपारनंतर मोठी गर्दी झाली होती. बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेक कुटुंबे नदीवर आली होती. अनेक गणेशभक्तांनी एकाचवेळी गायलेल्या आरत्यांनी गणपती घाट निनादत होता. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात भावपूर्ण अंतःकरणानीशी भाविकांनी बाप्पाला निरोप दिला. यांत्रिक बोटीतून मूर्ती नदीच्या मध्यभागी नेऊन विसर्जित करण्यात आल्या.
मंडळांनीही मिरवणुकीला फाटा देत वाहनातून मूर्ती आणल्या. एका वाहनातून चार ते सहा मंडळांनी मूर्ती आणाल्याचे पाहायला मिळाले. विसर्जनासाठी ढोलताशा आणि बँडबाजा नसला तरी कार्यकर्त्यांनी दिलेल्या ‘बाप्पा मोरया’च्या घोषणांनी कृष्णाघाट दणाणून गेला. मोठ्या मूर्ती एकेक करुन कृष्णेत विसर्जित करण्यात आल्या. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८४, विश्रामबाग ठाण्याच्या हद्दीतील ६१ व संजयनगर ठाण्याच्या हद्दीतील ४० मंडळांनी विसर्जन केले. पोलिसांनी गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना हाकलून लावले. सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता.
चौकट
मूर्तिदानाला प्रतिसाद
महापालिकेच्या मूर्तिदानाच्या आवाहनालाही प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने घरगुती उत्सवाच्या मूर्ती भाविकांनी दान केल्या. निर्माल्य कुंडामध्ये टाकले.
चौकट
डॉल्फिन ग्रुपतर्फे निर्माल्य संकलन
डॉल्फिन नेचर ग्रुपतर्फे नदीकाठी निर्माल्य संकलन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या आवाहनाला भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला. शशिकांत ऐनापुरे, अन्सार मगदूम, लक्ष्मण भावे, साक्षी साठे, हर्षवर्धन साठे, सचिन चोपडे, अरुण कांबळे, युवराज साठे, मनोज मुळीक, राजवर्धन साठे आदींनी उपक्रमात भाग घेतला.