वार्षिक योजनेचे १७४ कोटी ७५ लाख खर्च
By Admin | Updated: April 3, 2015 00:35 IST2015-04-02T23:46:32+5:302015-04-03T00:35:56+5:30
उद्दिष्ट पूर्ण : ७५ लाख रुपये शिल्लक; खर्चाची टक्केवारी ९९ टक्क्यांवर

वार्षिक योजनेचे १७४ कोटी ७५ लाख खर्च
सांगली : जिल्हा नियोजन समितीसाठी चालू आर्थिक वर्षात १७५ कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यामधील ५० कोटीहून अधिक रुपये महिन्याभरात खर्च करण्याचे आव्हान नियोजन समितीपुढे होते. यात समितीला यश आले आहे. ३१ मार्चअखेर १७४ कोटी ७५ लाख रुपये विकास कामांवर खर्च झाले आहेत. याची टक्केवारी ९९.८६ टक्के आहे. समितीचे २५ लाख, तर नेते आर. आर. पाटील यांच्या आमदार फंडाचे ५० लाख असे एकूण ७५ लाख रुपये मात्र अखर्चित राहिले आहेत. २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी १७५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. या वर्षात लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे नियोजन समितीच्या सभा चार ते पाच महिने होऊ शकल्या नाहीत. या काळात आचारसंहिता लागू झाल्याने चार ते पाच महिने वाया गेले. त्यामुळे मंजूर निधी मोठ्याप्रमाणात अखर्चित राहिला होता. मार्च महिन्यातच ५० कोटीच्या आसपास निधी अखर्चित राहिला होता. नियोजन समिती अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ते नियोजन करुन मार्चअखेर १७४ कोटी ७४ लाखांचा निधी खर्च केला आहे. यावर्षीचे उद्दिष्ट ९९.८६ टक्के इतके पूर्ण करण्यात आले आहे. नियोजन समितीमधील २५ लाखांचा निधी व आर. आर. पाटील यांच्या आमदार फंडातील ५० लाख रुपये मात्र शिल्लक राहिले आहेत. आर. आर. पाटील आजारी पडले, त्यानंतर त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा विकास निधी शिल्लक राहिला आहे. शासनाचे म्हणणे घेऊन हा निधी खर्च करण्यात येणार आहे.
वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण योजनेत गेल्या पाच वर्षात जवळपास दुपटीपर्यंत वाढ शासनाने केली आहे. २००९-२०१० या आर्थिक वर्षामध्ये ९९ कोटी १३ लाख ३० हजाराची तरतूद शासनाने केली होती. यावर्षी ती १७५ कोटींची करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
ननियोजन समितीने यावर्षी ९९.८६ टक्के निधी खर्चाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. निवडणुकांमुळे खर्चामध्ये गती कमी झाली होती. योग्यप्रकारे नियोजन झाल्यामुळे विकास कामांवर निधी खर्च झाला. यासाठी सदस्यांचे सहकार्य लाभले आहे. आता पुढील वर्षासाठीचे नियोजन सुरु करण्यात आले आहे.
- प्रमोद केंभावी, जिल्हा नियोजन अधिकारी, सांगली.