म्हैसाळजवळ १७ लाखाचा गुटखा, सुगंधी तंबाखू साठा जप्त; सांगलीतील एकास अटक

By घनशाम नवाथे | Published: April 10, 2024 08:22 PM2024-04-10T20:22:39+5:302024-04-10T20:22:46+5:30

स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई, संशयित मगदूम याच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17 lakh Gutkha, aromatic tobacco stock seized near Maisal; One arrested from Sangli | म्हैसाळजवळ १७ लाखाचा गुटखा, सुगंधी तंबाखू साठा जप्त; सांगलीतील एकास अटक

म्हैसाळजवळ १७ लाखाचा गुटखा, सुगंधी तंबाखू साठा जप्त; सांगलीतील एकास अटक

सांगली : म्हैसाळ ते मिरज रस्त्यावर सुगंधी तंबाखू, गुटखा तस्करी करणाऱी पिकअप स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडून १७ लाख ३० हजाराचा माल जप्त केला. पिकअपसह २५ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करून मधुसुदन महेश मगदूम (वय २२, रा. हसनी आश्रम नजीक, श्रीरामनगर, विजयनगर सांगली ) याला अटक केली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस पथकाला म्हैसाळ ते मिरज रस्त्यावरुन एका पिकअपमधून शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधी तंबाखू आणि गुटखा यांनी चोरुन विक्री करण्यासाठी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी परिसरात सापळा लावला होता. सायंकाळी ५ च्या सुमारास पिकअप (एमएच ०८ एपी ५०४७) भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यावर चालकाने रस्त्याकडेला वाहन थांबविले. पोलिसांनी तपासणी केली असता आतमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा असल्याचे निदर्शनास आले. त्यासंदर्भात चालक मधुसूदन मगदूम याच्याकडे विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली.

पोलिस चौकशीत चालक मगदूम याने कर्नाटकातील कुडची येथील प्रोपायटर पाटील ( पूर्ण नाव माहिती नाही) याच्या गोदामामधून भरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. तसेच स्वप्नील प्रभाकर लुगडे (रा. समतानगर, गल्ली क्र. १४, मिरज ) याच्या सांगण्यावरुन हा माल तेथे भरुन समतानगर येथे पोहचविण्यात येणार असल्याची कबुली दिली. संशयित मगदूम याच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी संकेत मगदूम यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, कर्मचारी अमोल लोहार, आमसिद्ध खोत, अमोल ऐदाळे, अमर नरळे, संजय कांबळे, सोमनाथ गुंडे, सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते, सुनिल जाधव, सूरज थोरात, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.

दोन दिवसात मोठी कारवाई-
अंकली फाट्यावर १४ लाख ८१ हजाराची सुगंधी तंबाखू, गुटखा, पानमसाला याचा साठा सांगली ग्रामीण पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर गुन्हे अन्वेषणच्या पथकाने म्हैसाळजवळ १७ लाख ३० हजाराचा साठा जप्त केला

Web Title: 17 lakh Gutkha, aromatic tobacco stock seized near Maisal; One arrested from Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.