१६७ अंगणवाड्या इमारतीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: December 21, 2015 00:47 IST2015-12-20T23:07:40+5:302015-12-21T00:47:11+5:30
जत तालुक्यातील स्थिती : ग्रामपंचायत, समाजमंदिरात भरतात अंगणवाड्या

१६७ अंगणवाड्या इमारतीच्या प्रतीक्षेत
गजानन पाटील -- संख -एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाचे व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, जागेचा अभाव, ग्रामस्थांची अनास्था यामुळे जत तालुक्यातील १६७ अंगणवाड्या स्वतंत्र इमारतीविना सुरू आहेत. या अंगणवाड्या प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, समाजमंदिर, देऊळ व खासगी इमारतीत भरवल्या जात आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्लेखन केलेल्या आणि सध्या धोकादायक असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत इमारतीत अंगणवाड्या भरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील अंगणवाडीचा झाला आहे. तालुक्यातील मोठ्या अंगणवाड्या १०५ व मिनी अंगणवाडी ६२ अंगणवाड्या स्वतंत्र इमारतीच्या प्रतीक्षेत आहेत.जत तालुक्यात ३४५ मोठ्या अंगणवाड्या आहेत; तर ८० मिनी अंगणवाड्या आहेत. तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ३४ हजार २३९ इतकी आहे. अंगणवाड्यांमध्ये ० ते ६ वर्षे वयोगटातील १६ हजार १३६ विद्यार्थी शिकत आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे जत व उमदी प्रकल्प आहेत. अंगणवाडी सेविकांतर्फे गावातील बालक, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, कुपोषित बालकांचा सर्व्हे करण्यात येतो.तालुक्यातील २४० मोठ्या अंगणवाड्या व १८ मिनी अंगणवाड्या स्वमालकीच्या इमारतीत सुरू आहेत. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सहकार्य व गावपातळीवरील लोकसहभागातून कायम दुष्काळग्रस्तांची प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा तालुक्यातील ६० अंगणवाड्या ‘आयएसओ’ करण्याचा कौतुकास्पद उपक्रम मोठ्या उत्साहाने राबविला जात आहे. परंतु १६७ अंगणवाड्यांची अवस्था फारच बिकट आहे.हक्काची इमारत नसल्यामुळे या अंगणवाड्या उपऱ्यासारखा आसरा मिळेल त्या ठिकाणी भरल्या जात आहेत. प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, समाजमंदिर, देऊळ, खासगी इमारतीमध्ये छोट्या बालकांना शिक्षणाचा श्रीगणेशा गिरविण्याची वेळ आली आहे. काही इमारती धोकादायक असतानाही तात्पुरता पर्याय म्हणून अशा ठिकाणी अंगणवाड्या भरवल्या जात आहेत.
२०१४-१५ या वर्षात पहिल्या टप्प्यात ३२ अंगणवाडी इमारतींना जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळाली होती. त्यापैकी काही इमारती पूर्ण झाल्या आहेत. तसेच इमारत नसलेल्या ९९ पैकी ४२ अंगणवाड्यांना मंजुरी मिळाले असून, बांधकाम सुरू आहे.
स्वतंत्र इमारत नसलेल्या ५७ अंगणवाड्यांपैकी ४८ अंगणवाड्यांना जागाच मिळत नसल्यामुळे इमारती मंजूर होऊ शकल्या नाहीत. तसेच ८ अंगणवाड्यांच्या इमारतींचे प्रस्ताव मंजुरीस पाठविण्यात आले आहेत. अंगणवाडीस स्वतंत्र इमारत नसलेल्या गावांमध्ये, वस्तीमध्ये ग्रामपंचायतीस गावठाण व गावरान जागा नसल्यामुळे जागा देण्यास कोणीही पुढे येत नसल्यामुळे इमारती होऊ शकल्या नाहीत. त्यासाठी गावपुढाऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या सहकार्याची गरज आहे.
अंगणवाड्यांसाठी जागा उपलब्ध झाली नसल्याने इमारत बांधकामे झालेली नाहीत. जागा उपलब्ध होतील तसे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात येतील. काही अंगणवाड्यांच्या टेंडरची कार्यवाही सुरू आहे. १८ इमारतींचे बांधकाम सुरु आहे. लवकरच इतरही अंगणवाड्यांच्या जागेचा प्रश्न मार्गी लावू.
- ए. आर. मडके
सहायक गटविकास अधिकारी,
तालुक्यात अनेक अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत नाही. यामुळे गैरसोय होते. अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत असल्यास चांगले अध्यापन होते. इतर सुविधा चांगल्याप्रकारे मिळतात. याकडे लक्ष देऊन विभागाने अंगणवाड्यांच्या इमारतींचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा, अशी आमची मागणी आहे.
- मुदका कांबळे,
सामाजिक कार्यकर्ते, दरीबडची
दरीबडची अंगणवाडी झाडाखाली
जत तालुक्यातील दरीबडची येथील गेजगे वस्ती मिनी अंगणवाडी सुरू होऊन ५ वर्षे झाली. अजूनही जागा उपलब्ध नसल्याने ही अंगणवाडी खासगी इमारतीमध्ये भरविण्यात येत आहे. मात्र ही जागाही व्यवस्थित नसल्यामुळे कडक उन्हातच ही अंगणवाडी झाडाखाली भरविली जाते. इमारत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांची तारांबळ सुरू आहे. मुलांना खेळण्यासाठी पुरेशी जागा नाही. पालकही उन्हातान्हात अंगणवाडीत मुलांना सोडण्यासाठी टाळाटाळ करतात. तालुक्यात अन्य ठिकाणच्या अंगणवाड्यांमध्येही फारशी वेगळी स्थिती नाही. लवकरात लवकर अंगणवाड्यांच्या इमारतींचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.