‘ताकारी-म्हैसाळ’साठी मिळणार १६५0 कोटी

By Admin | Updated: June 14, 2016 00:04 IST2016-06-13T23:54:51+5:302016-06-14T00:04:13+5:30

शशी शेखर : संजय पाटील यांना दिली माहिती

1650 crores for 'Takaari-Mhaysal' | ‘ताकारी-म्हैसाळ’साठी मिळणार १६५0 कोटी

‘ताकारी-म्हैसाळ’साठी मिळणार १६५0 कोटी

सांगली : जिल्ह्यातील ताकारी-म्हैसाळ योजना मार्च २0२0 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी पुढील तीन वर्षात १ हजार ६४३ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी केंद्र व राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे सचिव शशी शेखर यांनी खासदार संजयकाका पाटील यांना एका पत्राद्वारे दिली आहे.
या पत्राबाबत संजयकाका पाटील यांनी सांगितले की, ताकारी-म्हैसाळ योजना २0२0 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवले आहे. त्यासाठी वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत (एआयबीपी) केंद्र सरकारही आपला हिस्सा वेळेवर व सुनियोजित पद्धतीने देणार आहे. केंद्रीय जलसंपदा खात्याच्या माहितीनुसार, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १ हजार ६४३ कोटी ८९ लाख रुपये लागणार आहेत. चालूवर्षी ८0 कोटी, २0१७-१८ या वर्षाकरिता ४0४ कोटी ५ लाख, २0१८-१९ साठी ५५९ कोटी ३९ लाख आणि २0१९-२0२0 या वर्षाकरिता ६00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याबाबतचा आराखडा केंद्र व राज्य शासनाने तयार केला आहे. या प्रकल्पाच्या खर्चामधील 0.५७७ टक्के हिस्सा केंद्र शासन, तर 0.४२३ टक्के हिस्सा राज्य सरकार उचलणार आहे.
योजनेमधील केंद्र सरकारकडे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला सुमारे १८२ कोटी ८0 लाखाचा निधीसुद्धा तातडीने उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी आम्ही केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांच्याकडे केली होती. निधी कमी झाल्याने या प्रकल्पांचा वेग मंदावला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. २0१४-१५ च्या सुधारित खर्चात मोठी कपात केली होती आणि ती २0१५-१६ मधील तरतूदच संपुष्टात आली. त्यामुळे दोन्ही वर्षात केंद्राकडून या प्रकल्पाला निधी दिला गेला नव्हता. आता हा प्रकल्प मार्च २0२0 मध्ये पूर्ण करण्याचे निश्चित झाल्याने पुढील तीन वर्षे निधीची कोणतीही अडचण येणार नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 1650 crores for 'Takaari-Mhaysal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.