जिल्हा बँकेच्या ठेवीत १५५ कोटींची भर
By Admin | Updated: October 6, 2015 00:23 IST2015-10-05T23:32:42+5:302015-10-06T00:23:04+5:30
संपर्क अभियानाचा परिणाम : एटीएम, मास्टर कार्ड व आॅनलाईन बँकिंगचे पाऊल

जिल्हा बँकेच्या ठेवीत १५५ कोटींची भर
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी सुरू केलेल्या संपर्क अभियानास जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोहिमेच्या पंधरा दिवसातच जिल्हाभरातून तब्बल १५५ कोटी ९0 हजार रुपयांच्या ठेवी बँकेत जमा झाल्या आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, संपर्क अभियानाच्या माध्यमातून पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी थेट ग्राहकांशी संपर्क साधला. प्रत्येक तालुक्यात दौरा करून त्याठिकाणच्या ग्राहकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात आला. सुरुवातीपासूनच अभियानाला मोठा प्रतिसाद लाभला. पक्षीय मेळाव्याप्रमाणे या ग्राहक अभियानातील सभांना गर्दी झाली. संपर्क अभियान सुरू होण्यापूर्वी २१ सप्टेंबरला बँकेकडे ३ हजार ६५ कोटी ६६ लाख ६९ हजारांच्या ठेवी होत्या. सध्या या ठेवी ३ हजार २२0 कोटी ६७ लाख ५९ हजारावर गेल्या आहेत. यावर्षी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना ४ हजार ५00 कोटी ठेवींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ठेवी वाढविण्याबरोबरच त्याप्रमाणात कर्जवाटपाचेही उद्दिष्ट देण्यात आले आहे. ग्राहक संपर्क अभियानातून सेवेसंदर्भात बऱ्याच गोष्टी समोर आल्या. अनेक ग्राहकांनी पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याची मागणी केली. राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेची कर्जमर्यादा कमी असल्याची तक्रार करण्यात आली. फळबागांच्या कर्जवाटपाबाबतही अशाच स्वरुपाच्या तक्रारी आहेत. ऊस लागवडीच्या प्रकारानुसार होणाऱ्या कर्जवाटपाबाबतही अनेक ग्राहकांनी आक्षेप घेतला. सरसकट ऊस लागवडीसाठी समान धोरण ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी होत्या. ग्राहकांच्या तक्रारींची नोंद बँक अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या सर्व गोष्टी संचालक मंडळासमोर ठेवून योग्य ते सर्व निर्णय घेतले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
एटीएमची मागणी--अनेक तालुक्यांमध्ये, गावांमध्ये ग्राहकांनी एटीएम यंत्र बसविण्याची मागणी केली. काही ग्राहकांनी अन्य बँकांच्या एटीएममध्ये चालणारे मास्टर कार्ड सुरू करण्याची मागणीही केली. त्यानुसार शक्य त्याठिकाणी एटीएम यंत्र व ग्राहकांच्या मागणीप्रमाणे मास्टर कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.