वांगीतील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १५ कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST2021-06-09T04:35:01+5:302021-06-09T04:35:01+5:30
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पदनिर्मितीच्या प्रस्तावास मान्यता देऊन राज्य शासनाने १५ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे ...

वांगीतील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १५ कर्मचारी
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पदनिर्मितीच्या प्रस्तावास मान्यता देऊन राज्य शासनाने १५ कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. यासाठी राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता.
कोरोनाचा कालावधी संपल्यानंतर या आरोग्य केंद्रात सर्वसामान्य रुग्णांवर उपचारास सुरुवात होणार आहे.
वांगीतील आरोग्य केंद्राचा लाभ वांगी, शिवणी, शेळकबाव, हिंगणगाव खुर्द, तडसर, अंबक, शिरगाव, रामापूर आदी गावांतील रुग्णांना होणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश मोहिते यांच्या प्रयत्नांमुळे २०१४मध्ये तत्कालीन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी विशेष बाब म्हणून या आरोग्य केंद्रास मंजुरी दिली होती. कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून तीन कोटींचा निधीही वर्ग केला होता.
गावाच्या दक्षिणेस जुन्या खाणीलगत भूमिपूजन होऊन बांधकामही सुरू झाले. दरम्यान, राज्यातील सत्ताबदलानंतर काम काही दिवस बंद होते. काम सुरू होण्यासाठी वांगी ग्रामपंचायतीने उच्च न्यायालयात दाद मागितली आणि ही जागाच योग्य असल्याचे कळवित बांधकाम स्थगिती उठविली होती.
बांधकाम पूर्ण झाले. मात्र, पदनिर्मितीचे आदेश नसल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद होते. कोविड काळात प्रशासनाने येथे २४ ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. कोविड काळानंतर सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा विनाप्रवास आणि रात्रंदिवस मिळणार आहे. हे केंद्र तत्काळ सुरू होण्यासाठी डॉ. विश्वजित कदम यांनी सतत पाठपुरावा केला आहे.