लेंगरेच्या तरुणाकडून मुंबईच्या महिलेला १५ लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:35+5:302021-06-16T04:35:35+5:30
विटा : जर्मनीत डॉक्टर असल्याचा बनाव करून लेंगरेच्या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईतील वकील महिलेला १४ लाख ९२ हजार ...

लेंगरेच्या तरुणाकडून मुंबईच्या महिलेला १५ लाखाचा गंडा
विटा : जर्मनीत डॉक्टर असल्याचा बनाव करून लेंगरेच्या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईतील वकील महिलेला १४ लाख ९२ हजार रुपयांनी गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी वैभव सुरेश शिंदे (वय २९, रा. लेंगरे, ता. खानापूर, जि. सांगली) याला विटा पोलिसांनी अटक केली.
गेल्या वर्षी मे २०२० या महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू असल्याने अनेक जण इंटरनेट, सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. याच काळात लेंगरे येथील वैभव शिंदे यानेही फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर भरत जाधव या नावाने खोटे अकाऊंट काढले. दुसऱ्या तरुणाचे छायाचित्र लावून मुंबईतील महिला वकिलाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. प्रोफाईलमध्ये तो जर्मनीत डॉक्टर असल्याची खोटी माहिती दिली होती. वकील महिलेने त्याच्याशी मैत्री केली.
त्यानंतर चॅटिंग करून वैभव शिंदेने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने आपला मोबाईल क्रमांक तिला सोशल मीडियाद्वारे दिला. व्हाॅट्सॲपच्या माध्यमातूनही दोघांचे चॅटिंग सुरू झाले. त्याने मेसेजेस, फोन कॉल करून आणखी विश्वास संपादन केला.
यादरम्यान वेगवेगळी कारणे सांगून त्याने तिच्याकडून १४ लाख ९२ हजार रुपये घेतले. कोरोनाने आई, वडील आजारी आहेत, चुलत्यांचा मृत्यू झाला, बहिणीच्या पतीची प्रकृती गंभीर आहे. आपण भारतात येण्यासाठी निघतोय, परंतु आपले पाकीट हरविले आहे. त्यात क्रेडिट कार्ड्स, डेबिट कार्ड्स होती. तिकडे आल्यानंतर तुमची रक्कम बँकेच्या माध्यमातून ट्रान्सफर करतो, अशा बतावण्या त्याने केल्या. या सर्व गोष्टी खऱ्या वाटल्याने आपण पैसे दिले, असे संबंधित महिला वकिलाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अखेरीस ७ जूनला वैभव शिंदेने अचानक सोशल मीडियावरची भारत जाधव नावाने काढलेली सगळी अकाऊंट्स डीॲक्टिव्हेट केली.
त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला. व्हॉट्सॲप क्रमांकावरून तो लेंगरे गावातील वैभव शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महिलेने विटा पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना संपूर्ण हकीकत सांगितली. दोघांमधील संभाषणाचे आणि वैभव शिंदेला वेळोवेळी पैसे दिल्याचे पुरावे दिले. त्यावरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.