१४१ गावांत पाणीसाठा वाढणार
By Admin | Updated: May 4, 2015 00:35 IST2015-05-04T00:28:31+5:302015-05-04T00:35:35+5:30
जलयुक्त शिवार : जिल्ह्यात ९८ कोटींची तरतूद

१४१ गावांत पाणीसाठा वाढणार
सांगली : जिल्ह्यातील गावांमध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून, यासाठी जिल्ह्यातील १४१ गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ९८ कोटी २९ लाखांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवाराचा प्रारंभ २६ जानेवारी रोजी करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानातून गावा-गावात पाणीसाठे निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या अभियानातून गावातील पाण्याचे स्रोत पुन्हा जिवंत करण्याच्या कामास प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यात यावर्षी १४१ गावांची निवड करण्यात आली आहे. या अभियानातून जलसंधारणाची १ हजार ३५१ कामे घेण्यात येत आहेत. यासाठी ९८ कोटी २९ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शिराळा, वाळवा व पलूस तालुक्यातही हे अभियान राबविण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत.
जलयुक्त शिवारामुळे गावा-गावात पाणीसाठा निर्माण होण्यास मदत होणार आहे. यामुळे भविष्यात टँकरमुक्त गाव होण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवारामुळे भूजल पातळीही वाढण्यास मदत होणार आहे. या जलयुक्त शिवाराचा आगामी चार-पाच वर्षात चांगला उपयोग होणार आहे. आगामी काळात शिराळा, वाळवा व पलूस तालुक्यातही जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. टप्प्या-टप्प्याने हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
पेरणी क्षेत्र वाढण्यास मदत
जलयुक्त शिवारामुळे पेरणी क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात ३ लाख ९१ हजार २०० हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र होते. त्यापैकी ३ लाख ४२ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. पेरणीची ही टक्केवारी ९३.६ टक्के इतकी आहे. यावर्षी हे क्षेत्र वाढणार आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी पुरेसे बी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा साठा उपलब्ध करुन देण्याबाबत कृषी विभागाने नियोजन केले आहे.