शहरात १.३८ लाख घरे, अधिकृत नळधारक ८५ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST2021-02-10T04:27:11+5:302021-02-10T04:27:11+5:30

सांगली : महापालिका क्षेत्रात १ लाख ३८ हजार घरे, तर ८५ हजार ८३ अधिकृत नळधारक आहेत. या नळधारकांकडे जवळपास ...

1.38 lakh houses in the city, 85,000 official plumbing | शहरात १.३८ लाख घरे, अधिकृत नळधारक ८५ हजार

शहरात १.३८ लाख घरे, अधिकृत नळधारक ८५ हजार

सांगली : महापालिका क्षेत्रात १ लाख ३८ हजार घरे, तर ८५ हजार ८३ अधिकृत नळधारक आहेत. या नळधारकांकडे जवळपास २४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वर्षाला पाणीपुरवठा विभागाकडून १२ ते १३ कोटीचे उत्पन्न मिळते. त्यात मालमत्ताधारक अधिक व नळधारक कमी असे समीकरण असल्याने अनधिकृत कनेक्शनची शक्यता अधिक आहे. पण त्याचा कुठलाच सर्व्हे महापालिकेने केलेला नाही.

महापालिकेच्या स्थापनेला २३ वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत पाणीपुरवठा व्यवस्थेत अनेक बदल झाले. शहराचा विस्तारही तितक्यात गतीने झाला. उपनगरापर्यंत पाणी पोहोच करण्याचे काम महापालिकेने केले आहे. त्यासाठी वेळोवेळी पाणी योजनेचा विस्तार करण्यात आला.

सध्या महापालिकेकडे १ लाख ३८ हजार मालमत्ताधारक आहेत. त्यात घरगुती व व्यावसायिक मालमत्ताधारकांचा समावेश आहे. यापैकी २५ हजार व्यावसायिक मालमत्ताधारकांना पाण्याची गरज नाही, असे गृहीत धरले तरी किमान एक लाख १३ हजार मालमत्ताधारकांकडे नळ कनेक्शन असणे अपेक्षित आहेत. पण अधिकृत नळधारकांचा आकडा ८५ हजाराच्या घरातच आहे. त्यामुळे अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या अधिक असल्याची शक्यता आहे.

महापालिकेने मालमत्ता व अधिकृत नळ कनेक्शनची संख्या याची आजअखेर पडताळणी केलेली नाही. त्यातच पाणीपुरवठा विभागात महापालिकेत सेवेत रुजू झाल्यापासून तेच कर्मचारी काम करीत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे मालमत्ताधारकांशी स्नेहबंध असू शकतात. त्यातून अनधिकृत नळ कनेक्शन जोडले जाऊ शकते. पण याची शहानिशा सर्व्हे केल्याशिवाय होणार नाही. आयुक्त नितीन कापडणीस यांनी सध्या मालमत्तासह नळ कनेक्शनच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्याचे संकेत दिले आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर अनधिकृत नळधारकांची संख्या समोर येईल.

चौकट

२ हजार

अनधिकृत नळ

अनधिकृत कनेक्शनबाबत सर्व्हे झालेला नाही. मनपा म्हणण्यानुसार दोन ते तीन हजार अनधिकृत कनेक्शन असू शकतात. यापेक्षाही अनधिकृतची संख्या कमी असल्याचा दावा केला जात आहे.

चौकट

२५ टक्के पाण्याची गळती

सांगली व मिरज या दोन ठिकाणाहून महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा होतो. दररोज ११५ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जातो. त्यापैकी २५ टक्के पाण्याची गळती होते. त्यात शहरातील जलवाहिन्याच्या गळतीमुळे सर्वाधिक पाण्याचा अपव्यय होत आहे.

चौकट

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची एकूण थकबाकी २४ कोटी रुपयांच्या घरात आहे. दरवर्षी १२ ते १३ कोटी रुपयांची वसुली होती.

उर्वरित कराची वसुली होत नाही. अनेकांनी पाणी कनेक्शन बंद केले आहे. त्यांच्याकडेही थकबाकी आहे. या वसुलीसाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याची गरज आहे.

कोट

पालिकेकडून ना नफा ना तोटा तत्वावर नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता मालमत्ता सर्व्हे सोबत पाणी कनेक्शनची तपासणी केली जाणार आहे. त्यातून अनधिकृतची संख्या समोर येईल.

- नितीन कापडणीस, आयुक्त

चौकट

शहराची लोकसंख्या : ५,५०,०००

एकूण घरे: १,३८, ३८६

अधिकृत नळधारक: ८५,०८३

Web Title: 1.38 lakh houses in the city, 85,000 official plumbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.