विद्यार्थी वाहतूक करणारी १३२ वाहने दोषी
By Admin | Updated: March 7, 2015 00:00 IST2015-03-06T23:55:48+5:302015-03-07T00:00:51+5:30
आरटीओंकडून तपासणी : परवाना, नोंदणी निलंबित; पावणेदोन लाखाचा कर वसूल

विद्यार्थी वाहतूक करणारी १३२ वाहने दोषी
सचिन लाड / सांगली
नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या तपासणी मोहिमेत तब्बल १३२ वाहने दोषी आढळली आहेत. या वाहनांचा परवाना व नोंदणी दोन ते महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पावणेदोन लाखांचा कर वसूल करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) दशरथ वाघुले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने कशी असावीत, याची शासनाने नियमावली तयार केली आहे. यामध्ये ३२ नियम आहेत. या नियमांचे पालन करण्यासाठी जिल्हा, तालुका व प्रत्येक शाळा, महाविद्यालयस्तरावर समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीकडून प्रत्येक महिन्याला बैठक होणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयातील समितीच्या बैठकीत पालकांनी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या समस्या मांडल्या, तर जिल्हा व तालुकास्तरावर समितीने त्याची तातडीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. मात्र बैठक होत नसल्याने समस्या मांडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परिणामी वाहनधारकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. यातून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे. गेल्या वर्षभरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एका मुलीचा बळी गेला. केवळ जिल्हास्तरावरील समितीची बैठक होऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी चर्चा होते.
वाहन चालकाचे वर्तन चांगले आहे का नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी समितीची आहे. मात्र याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. यातूनच सहा महिन्यापूर्वी येळावी (ता. तासगाव) येथे एका चालकाने वाहनातच एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. अशा घटना घडल्या की, नियमावर बोट ठेवले जाते, त्यावर चार-आठ दिवस चर्चा होते. मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे-थे राहते. बस, व्हॅन, मॅझिक, रिक्षा ही वाहने प्रामुख्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. ३४३ अधिकृत विद्यार्थी वाहतुक करणारी वाहने आहेत. त्यांच्याकडे विद्यार्थी वाहतुकीचा परवाना आहे. यामुळे त्यांनी वाहने नियमाप्रमाणे ठेवली आहेत का नाही, ही तपासणी करण्याचे काम आरटीओ व शाला समितीचे आहे. आरटीओंकडून तपासणी मोहीम सुरु असते. कारवाईचा बडगा उगारला जातो. परंतु तरीही चालकांकडून नियमांचे पालन होताना दिसत नसल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.