बोगस सफाई कामगार भरतीप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: December 21, 2014 00:42 IST2014-12-21T00:42:03+5:302014-12-21T00:42:15+5:30
महापालिकेची फिर्याद : खोट्या नियुक्तीपत्राद्वारे केली फसवणूक; प्रकरण उघड झाल्यानंतर सहा महिन्यांनी तक्रार

बोगस सफाई कामगार भरतीप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा
मिरज : मिरजेत महापालिकेच्या मानधनावरील सफाई कर्मचारी घोटाळाप्रकरणी प्रशासन अधिकारी कल्लाप्पा हळिंगळे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. कामगारांना बोगस नियुक्तीपत्रे देणारा सहाय्यक मुकादम राजू इलाही म्हेतर याच्यासह १३ जणांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेच्या प्रभाग चारमध्ये बनावट नियुक्तीपत्राद्वारे मानधनावर सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. सफाई कर्मचाऱ्यांकडून नियुक्तीसाठी ४० ते ५० हजार रुपये घेऊन त्यांची हजेरीपत्रकावर नोंद करण्यात आली. १ नोव्हेंबर १३ ते २८ फेब्रुवारी १४ अखेर या सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेने लाखो रुपये वेतनही दिले. चार महिन्यांपूर्वी दलित महासंघाने केलेल्या तक्रारीमुळे बोगस नियुक्तीपत्राव्दारे कर्मचारी भरती प्रकरण उघडकीस आले; मात्र याबाबत तब्बल सहा महिन्यांनी प्रशासन अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रशासन अधिकारी हळिंगळे यांनी मिरजेत प्रभाग चारमधील आरोग्य विभागाचा सहाय्यक मुकादम राजू म्हेतर याने बोगस नियुक्तीपत्राद्वारे १३ सफाई कर्मचाऱ्यांची भरती करून १ लाख २६ हजारांची
पाच लाखाचा फटका..
बोगस भरती प्रकरण उघडकीस आल्यानंतर भरती झालेल्या मानधनावरील सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले. मात्र सहाय्यक मुकादमास कामावर ठेवण्यात आले. वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहीने मानधनावरील कर्मचाऱ्यांचे वेतन मंजूर होऊन महापालिकेला सुमारे पाच लाखांचा फटका बसला आहे. मात्र या प्रकरणात केवळ सहाय्यक मुकादमास बळीचा बकरा बनविण्यात आल्याची सफाई कर्मचाऱ्यांत चर्चा आहे.
बोगस कर्मचारी ५६; गुन्हा १३ जणांवर
मानधनावरील कंत्राटी सफाई कर्मचारी भरतीत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार आहे. प्रभाग चारमध्ये सापडलेल्या १२ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र प्रभाग दोन व तीनमध्येही बोगस कामगारांची बोगस नियुक्ती झाली आहे. एकूण ५६ बोगस कर्मचाऱ्यांपैकी केवळ १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.