कर्जाच्या आमिषाने शेतकऱ्याची १३ लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:01+5:302021-02-05T07:24:01+5:30
राजाराम शाबा मगदूम (रा. कागवाड) यांची म्हैसाळ येथे शेती आहे. मगदूम यांना शेतीसाठी व शेतात घर बांधण्यासाठी बँकेच्या कर्जाची ...

कर्जाच्या आमिषाने शेतकऱ्याची १३ लाखाची फसवणूक
राजाराम शाबा मगदूम (रा. कागवाड) यांची म्हैसाळ येथे शेती आहे. मगदूम यांना शेतीसाठी व शेतात घर बांधण्यासाठी बँकेच्या कर्जाची आवश्यकता होती. बँकेचे कर्ज मिळवून देण्यासाठी राजेश गुंडाप्पा जैन याने मगदूम यांच्या जमिनीची कागदपत्रे, कोरे धनादेश व सह्या घेतल्या. मगदूम यांच्या नावावर असलेल्या वसंत सोसायटीच्या खात्यावर जैन याने ५ लाख २० हजार रूपये कर्जाची रक्कम भरली. मगदूम यांचा विश्वास संपादन केल्यानंतर जैन याने त्यांची जमीन तारण ठेवून बँकेचे १८ लाखाचे कर्ज मंजूर करुन घेतले. मात्र कर्जाची ही रक्कम मगदूम यांना न देता स्वत:सह व अशोक पाटील, बाबासाहेब कागवाडे, संदीप धुमाळ, वृषभ राजेश जैन, गिरीजादेवी शिंदे (सर्व रा. म्हैसाळ) यांच्या नावाने धनादेशाद्वारे काढून घेतली. संगनमत करून मगदूम यांच्या कर्ज खात्यातील शेती पीक कर्जाची रक्कम परस्पर काढून मगदूम यांना शेती साहित्य, घर बांधकामाचे साहित्य न देता त्यांचा विश्वासघात करून १२ लाख ८० लाख रूपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत राजेश गुंडाप्पा जैन, अशोक तात्यासाहेब पाटील, बाबासाहेब कागवाडे, संदीप सुरेश धुमाळ, वृषभ राजेश जैन, गिरीजादेवी शिंदे (सर्व रा. म्हैसाळ) या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणास अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.