‘राजारामबापू’चे १३ संचालक बिनविरोध
By Admin | Updated: May 21, 2015 00:01 IST2015-05-20T23:02:03+5:302015-05-21T00:01:47+5:30
शेतकरी संघटनेचे चारजण रिंगणात : सात विद्यमान संचालकांना सक्तीची विश्रांती

‘राजारामबापू’चे १३ संचालक बिनविरोध
इस्लामपूर : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवार बिनविरोध संचालक म्हणून निवडून आले, तर बोरगाव, आष्टा, अनुसूचित जाती-जमाती व भटक्या विमुक्त जाती प्रवर्गासाठी निवडणूक लागली. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेतही आमदार जयंत पाटील यांनी सात विद्यमान संचालकांना सक्तीची विश्रांती दिली.
निवडणूक कार्यालयात बुधवारी प्रभारी निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासमोर अर्ज माघारीची प्रक्रिया झाली. २१ जागांसाठी एकूण ७१ अर्ज दाखल झाले होते. छाननीत शेतकरी संघटनेच्या सात उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले होते; मात्र त्यातील दोघांचे अर्ज साखर संचालकांसमोरील अपिलात पात्र ठरले. आता आठ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
अर्ज माघारीनंतर बिनविरोध निवडून आलेले प्रवर्गनिहाय संचालक असे- कारखान्याचे मार्गदर्शक आमदार जयंत पाटील व आनंदराव पाटील (रेठरेधरण उत्पादक गट क्रमांक ५ पेठ), विद्यमान अध्यक्ष पी. आर. पाटील (कुरळप), दिलीप पाटील (येलूर- उत्पादक गट क्र. ४ कुरळप), ए. टी. पाटील (गोटखिंडी), भगवान पाटील (इस्लामपूर), जगदीश पाटील (कामेरी- उत्पादक गट क्र. १- इस्लामपूर), प्रकाश ऊर्फ बाळासाहेब पवार (कुंडल), दादासाहेब मोरे (रेठरेहरणाक्ष उत्पादक गट क्र. ६ कुंडल) यांच्यासह महिलांमधून सौ. सुवर्णा पाटील (बहे), सौ. मेघा पाटील (शिगाव), उत्पादक सहकारी संस्था गटातून जि. प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील (कासेगाव) व इतर मागासवर्गीय प्रवर्गातून लक्ष्मण माळी (बागणी) यांचा समावेश आहे.
शेतकरी संघटनेच्या ४ उमेदवारांनी माघार न घेतल्याने बोरगाव, आष्टा या उत्पादक गटांसह अनुसूचित जाती-जमाती व भ. जा. वि. ज. या प्रवर्गासाठी निवडणूक लागली. आता त्यासाठी प्रशासनाला २८ मे रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान घ्यावे लागणार आहे. त्यानंतर २९ मे रोजी मतमोजणी होईल.
बोरगाव उत्पादक गटातून विद्यमान उपाध्यक्ष विजय पाटील (साखराळे), संचालक कार्तिक पाटील (बोरगाव) व प्रदीप थोरात (नरसिंहपूर) यांच्यासह शेतकरी संघटनेचे रवींद्र पिसाळ (साखराळे) हे उमेदवार असतील, तर आष्टा उत्पादक गटातून विद्यमान संचालक श्रीकांत कबाडे (कारंदवाडी), विराज शिंदे (आष्टा) व नव्याने संधी मिळालेले प्रदीपकुमार पाटील (शिगाव) यांच्याविरुध्द संघटनेच्या उदय पाटील (बावची) यांचा अर्ज राहिला.
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून विद्यमान संचालक जालिंदर महार (इस्लामपूर) यांच्याविरुध्द वसंत गायकवाड (साखराळे), तर भ. जा. वि. ज. गटातून माणिक शेळके (आष्टा) यांच्याविरुध्द धनाजी डांगे (साखराळे) हे संघटनेचे उमेदवार असतील. (वार्ताहर)