तांबवेत एकरी १२५ टन ऊस उत्पादन
By Admin | Updated: November 28, 2015 00:17 IST2015-11-27T23:38:41+5:302015-11-28T00:17:05+5:30
शेतकऱ्यांपुढे आदर्श : फूलशेतीला बगल देत ऊस उत्पादन

तांबवेत एकरी १२५ टन ऊस उत्पादन
इस्लामपूर : तांबवे (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी महिपती हंबीरराव पाटील यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर एका एकरात १२४़ ६६१ मेट्रिक टन इतके विक्रमी उसाचे उत्पादन घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे़ पाटील हे राजारामबापू सह. साखर कारखान्याचे कर्मचारी नेताजी पाटील यांचे बंधू आहेत.पाटील यांनी काही वर्षे आपल्या शेतात फूलशेती केली. गेल्यावर्षी त्यांनी आपल्या शेतात ९२ टन उसाचे उत्पादन घेतले़ मात्र राजारामबापू साखर कारखान्याने ‘लक्ष्य एकरी १00 टन उसाचे’ हा प्रकल्प काही वर्षांपूर्वी राबविल्यामुळे सध्या वाळवा तालुक्यात अनेक शेतकरी १00 टनापर्यंत पोहोचले आहेत. सध्या कारखाना व आमदार जयंत पाटील यांनी ‘एकरी १५0 टनाचे लक्ष्य’ शेतकऱ्यांना दिले आहे़ यातूनच प्रेरणा घेऊन कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील यांनी एकरी १५0 टनाचे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार केला़पाटील यांनी आपल्या शेताची उत्तम मशागत करून घेऊन साडेचार फुटी सरी सोडली़ यानंतर त्यांनी वाफ्यावर को़ सी़ ८६0३२ या जातीच्या रोपांची लागण केली़ त्यांची २५-३0 दिवसांनी उत्तम वाढ झाल्यानंतर १ डोळा २-२ फुटावर आडसाली लागण केली़ यानंतर त्यांनी बेसल डोस, जिवाणंूची आळवणी घेतली़ ४५ दिवसांनी नत्राची मात्रा सुरू केली़ पहिल्या ४५ दिवसांनी पहिली संजीवके, कीटकनाशकांची फवारणी केली़ यानंतर प्रत्येक २0-२५ दिवसांच्या अंतराने ६ फवारण्या केल्या़ खतांची मात्रा देताना सेंद्रीय खते आणि रासायनिक खतांचा समतोल राखण्याच्या सातत्याने प्रयत्न केला़ हा ऊस राजारामबापू सह़ साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरूल युनिटसाठी तोडण्यात आला. तोडणीच्यावेळी प्रत्येक बुडख्यात १४ ते १६ ऊस होते आणि प्रत्येक उसाला सरासरी ४५ ते ४६ कांड्या होत्या़
माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, अध्यक्ष पी़ आऱ पाटील, उपाध्यक्ष विजयबापू पाटील, कार्यकारी संचालक आऱ डी़ माहुली, शेती अधिकारी आबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी पाटील यांचे अभिनंदन केले़ (वार्ताहर)