जिल्ह्यात १२०० गुन्हेगार ‘वॉन्टेड’
By Admin | Updated: August 28, 2015 22:59 IST2015-08-28T22:59:32+5:302015-08-28T22:59:32+5:30
संथगतीने शोध : परराज्यातील संख्या मोठी; यादी वाढत चालली

जिल्ह्यात १२०० गुन्हेगार ‘वॉन्टेड’
सचिन लाड- सांगली --जिल्ह्यात विविध गुन्ह्यांतील सुमारे बाराशे गुन्हेगार फरारी आहेत. स्थानिक पोलीस ठाण्यांकडून या गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याने दिवसेंदिवस फरारी गुन्हेगारांची यादी वाढतच आहे. केवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागच फरारींना पकडत आहे. बाराशेपैकी सातशे गुन्हेगार परराज्यातील आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणे व त्यांना पकडणे आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळे फरारी गुन्हेगारांची यादी कधीच कमी होताना दिसत नाही.
गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचा आलेख वाढत गेला आहे. गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धत सातत्याने बदलत आहे. या गुन्हेगारांना पकडणे आणि गुन्हा उघडकीस आणणे फार कठीण बनले आहे. यातच अनुभवी पोलिसांचीही कमतरता आहे. परराज्यातील गुन्हेगारांनी जिल्ह्यात शिरकाव केला आहे. गुन्हा केला की, पाच-दहा मिनिटात ते जिल्ह्याबाहेर निघून गेलेले असतात. त्यामुळे त्यांची काहीच माहिती नसते. यातूनच खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, मारामारी, दरोडा, वाटमारी, खंडणी, अपहरण, फसवणूक यांसह अनेक गुन्ह्यांतील बाराशे गुन्हेगार वॉन्टेड आहेत. त्यांना पकडण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे अन्वेषणची असल्याने स्थानिक पोलीस शांत आहेत.
बाराशेपैकी सातशे गुन्हेगार परराज्यातील आहेत. अनेकदा संपूर्ण टोळी कधीच पोलिसांच्या हाताला लागलेली नाही. एक-दोन गुन्हेगारांना पकडायचे राहतेच. पुन्हा या प्रकरणाकडे लक्ष दिले जात नाही. एखादा गुन्हेगार सापडत नसेल, तर त्याला फरारींच्या यादीत टाकले जाते. परराज्यातील गुन्हेगारांना पकडणे फार कठीण बनले आहे. त्यांची माहिती काढणे, तिथंपर्यंत जाणे, तेथील पोलीस सहकार्य करतील का नाही, जाताना किमान चार-पाच पोलिसांचे पथक, सुसज्ज वाहन या सर्व गोष्टींची गरज आहे. परंतु दररोज नवीन काही तरी काम समोर येत असल्याने, फरारी गुन्हेगारांना पकडण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
वाळवा तालुक्यातील गुंड भावश्या पाटील यास मोठ्या शिताफीने पकडले. मात्र न्यायालयात नेताना तो फरार झाला. या घटनेला पाच वर्षे होऊन गेली तरी त्याची काहीच खबर नाही.
साठ गुन्हेगारांना पकडले
जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला फरारी गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने गेल्या तीन महिन्यात विविध गुन्ह्यांतील ६० गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. या गुन्हेगारांना गुन्हा दाखल असलेल्या संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अजूनही त्यांच्याकडून फरारींचा शोध घेतला जात आहे.