कृष्णाकाठावरील मगरींपासून संरक्षणासाठी १२ लाख मंजूर

By Admin | Updated: November 22, 2015 00:03 IST2015-11-21T23:44:14+5:302015-11-22T00:03:51+5:30

भारती गुरव : चार गावांसाठी संरक्षण कुंपण

12 lakhs sanctioned to protect the coronation from Krishna | कृष्णाकाठावरील मगरींपासून संरक्षणासाठी १२ लाख मंजूर

कृष्णाकाठावरील मगरींपासून संरक्षणासाठी १२ लाख मंजूर

भिलवडी : कृष्णाकाठावरील मगरीच्या हल्ल्यामुळे भयग्रस्त बनलेल्या गावांमधील नागरिकांच्या संरक्षणासाठी जिल्हा परिषद व वनविभागाच्या माध्यमातून पलूस तालुक्यातील भिलवडीसह चार गावांना बारा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती भिलवडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या भारती गुरव यांनी दिली.
मगरींच्या दहशतीखाली असणाऱ्या संवेदनशील अशा भिलवडी, साखरवाडी, चोपडेवाडी, सुखवाडी अशा चार ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. या नदीकाठी असलेल्या गावातील प्रमुख पाणवठ्यांवर मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असतो. मगरीपासून नागरिकांच्या तसेच जनावरांच्या जीविताचे संरक्षण व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे वन विभागाकडे वारंवार मागणी व सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते या विषयास मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव वन विभागाकडे पाठविल्यानंतर त्यास तात्काळ मान्यता देण्यात आली आहे.
भिलवडी, साखरवाडी, चोपडेवाडी, सुखवाडी या चार ठिकाणी कृष्णा नदीच्या पाणवठ्यावर संरक्षण कुंपण उभारण्यासाठी सांगली येथील उपविभागीय वनअधिकारी समाधान चव्हाण यांनी बारा लाखांचा निधी मंजूर केला आहे. प्रत्येक ठिकाणी तीन लाख रुपये खर्च करून पाण्यात टी आकाराचे संरक्षण कुंपण उभारण्यात येणार आहे. (वार्ताहर)
भयभीत नदीकाठाला मिळणार दिलासा....
काही महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यातील संपूर्ण कृष्णाकाठावर मगरींची दहशत पसरली होती. मगरीने नागरिकांवर हल्ले सुरू केल्यानंतर नदीकाठावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मगरी पकडण्याचाही प्रयत्न अनेकदा करण्यात आला, मात्र त्यास यश आले नाही. मगरी पकडण्याऐवजी नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार आता सुरक्षेसाठी पहिले पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Web Title: 12 lakhs sanctioned to protect the coronation from Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.