हुतात्मा बँकेस ११ काेटी ८३ लाखांचा नफा : वैभव नायकवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:28 IST2021-04-04T04:28:27+5:302021-04-04T04:28:27+5:30
वाळवा : सलग दोन वर्षे महापूर व कोरोनाचे संकट असताना हुतात्मा बँकेने सर्व अडचणींवर मात करत २०२०-२१ या ...

हुतात्मा बँकेस ११ काेटी ८३ लाखांचा नफा : वैभव नायकवडी
वाळवा : सलग दोन वर्षे महापूर व कोरोनाचे संकट असताना हुतात्मा बँकेने सर्व अडचणींवर मात करत २०२०-२१ या आर्थिक वर्षात ११ कोटी ८३ लाख रुपये ढोबळ नफा मिळविला आहे. आर्थिक वर्षात ६२९ कोटींचा व्यवसाय केला असून, एनपीए शून्य टक्के राखला आहे, अशी माहिती संस्थापक वैभव नायकवडी यांनी दिली.
नायकवडी म्हणाले, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार भांडवल पर्याप्तता प्रमाण ९ टक्के आहे. मात्र, हुतात्मा बँकेने ते १६ टक्केपेक्षा जास्त राखले आहे. यावरून बँकेची आर्थिक सुदृढता दिसून येते. बँकेचे नेटवर्थ ६२ कोटी आहे. ३८४ कोटींच्या ठेवी असून, २४५ कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. ग्राॅस एनपीए ४.७१ टक्के आहे.
बँकेचे महाराष्ट्र कार्यक्षेत्र आहे. बँकेने आरटीजीएस, एनईएफटी, एटीएम, मोबाईल बँकिंग, एसएमएस अलर्ट सुविधा या सेवा ग्राहकांना विना तक्रार पुरविल्या आहेत. बँकेच्या आधार कार्ड आधारित सेवेने ग्राहकांना भारत सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा सहज मिळू लागल्या आहेत. मोबाईल ॲपच्या सेवेने फंड ट्रान्स्फर, विमान, रेल्वे, बस तिकीट बुकिंग, वीज व फोन बिल भरणे या सेवेचा लाभ ग्राहक सभासद घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ग्रामीण भागांत हुतात्मा बँक प्रथम क्रमांकावर आहे. बँकेच्या महाराष्ट्रभर १६ शाखा आहेत. बँक सर्वसामान्य ग्राहक हा केंद्रबिंदू मानून कामकाज करत आहे.
यावेळी बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, उपाध्यक्ष महंमद चाऊस, नंदिनी नायकवडी, दिलीप पाटील, बाजीराव मांगलेकर, गंगाराम सूर्यवंशी, अर्जुन वडगावे, शरद खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक चौगुले, जनरल मॅनेजर श्रीकांत चव्हाण, रमेश आचरे उपस्थित होते.