गस्त घालणाऱ्या ११ तरुणांना अटक
By Admin | Updated: August 4, 2015 00:04 IST2015-08-03T23:36:48+5:302015-08-04T00:04:13+5:30
सांगलीत कारवाई : गस्तीच्या नावाखाली दहशत भोवली; तलवार, लोखंडी गज, काठ्या जप्त

गस्त घालणाऱ्या ११ तरुणांना अटक
सांगली : चोरांना पकडण्यासाठी गस्तीच्या नावाखाली हातात शस्त्रे घेऊन दहशत माजविणाऱ्या गस्त पथकांतील तरुणांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली आहे. रविवारी रात्री हनुमाननगर, लिमये मळा, शंभरफुटी, गावभाग व विश्रामबाग परिसरात जाऊन दहशत माजवून हुल्लडबाजी करणाऱ्या ११ तरुणांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तलवार, लोखंडी गज, काठ्या जप्त केल्या आहेत. अटक केलेल्यांमध्ये अशोक रामगोंडा सिद्धरेड्डी (वय २३), नितीन मल्लिकार्जुन म्हेत्रे (२२), रवी सुभाष गायकवाड (१९), लाडजी मखबूल सनदी (२८, चौघे, रा. हनुमानगर, सांगली), बंदेनवाज हुसेन आत्तार (२६), महादेव कृष्णा धोटुडे (५५), इरफान आयुब शेख (२२), आयुब मौला शेख (४०, चौघे, रा. शंभरफुटी रस्ता, सांगली), सदाशिव उत्तम बाळ (३०, किसान चौक), दैवत रमेश जाधव (२३, गावभाग, सांगली) व निरंजन कल्याण आडके (२१, विश्रामबाग) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध शांतता भंग करणे, हुल्लडबाजी करणे, दहशत निर्माण करणे, बेकायदा हत्यार बाळगणे, अफवा पसरविणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेश व गडचिरोली येथील तीन हजार गुन्हेगारांनी जिल्ह्यात शिरकाव केल्याची अफवा पसरल्याने गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात गस्त सुरू आहे. गस्तीचे हे लोण शहरातही पसरले आहे. पण गस्तीच्या नावाखाली त्यांची दहशत सुरूआहे; तसेच स्वत:ची गल्ली सोडून ते अन्य भागांत जाऊन दहशत माजवीत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. रविवारी रात्री पोलिसांनी शोधमोहीम राबविली. त्यावेळी हे अकरा तरुण दुचाकीवरून ट्रिपल सीट जाताना आढळून आले. त्यांची हुल्लडबाजी सुरू होती. त्यांच्याकडे शस्त्रेही होती. त्यांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांनी घेतल्या बैठका
पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांनी सोमवारी शहरातील हनुमाननगर, लिमये मळा व आप्पासाहेब पाटीलनगरमध्ये रहिवाशांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी कायदा हातात घेऊ नये, पाचपेक्षा जादा लोकांनी गस्त घालू नये, हत्यारे बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, संशयित कोणी आढळून आल्यास त्यास पकडून पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.