सांगलीतील ११ रेशन दुकाने रडारवर
By Admin | Updated: December 1, 2014 00:14 IST2014-11-30T22:18:35+5:302014-12-01T00:14:25+5:30
तपासणीत संशय : पंधरवड्यात मोहीम पूर्ण झाल्यानंतर कारवाईची शक्यता

सांगलीतील ११ रेशन दुकाने रडारवर
सांगली : ग्राहकांच्या तक्रारीनंतर सांगली शहर व परिसरात रेशन दुकानदारांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. या तपासणीत किरकोळ, मध्यम व गंभीर स्वरुपाच्या तक्रारींची माहिती घेण्यात येत आहे. अकरा रेशन दुकाने सध्या प्रशासनाच्या रडारवर असल्याचे समजते.
सांगलीच्या अन्नधान्य वितरण कार्यालयाकडे सांगलीसह तीस गावांचा समावेश आहे. यामध्ये २२० स्वस्त धान्य दुकानांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात दुकानदारांकडे आलेले धान्य, त्यांच्याकडून वितरित करण्यात आलेले धान्य, योग्य लाभार्थींना लाभ मिळाला का, रॉकेलचे वाटप योग्य पध्दतीने झाले आहे का, याची माहिती या तपासणीमध्ये घेण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून दुकानांची तपासणी सुरु असून, पंधरवड्यात तपासणी पूर्ण होणार आहे.
आजपर्यंत तपासणी केलेल्या दुकानांपैकी ११ दुकाने दोषी आढळल्याचे समजते. त्यांचे परवाने निलंबित करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. किरकोळ स्वरुपात चुका आढळलेल्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शहर विभागात चार निरीक्षक असल्यामुळे एका निरीक्षकाकडे सुमारे ६० दुकाने तपासणीसाठी येतात. वर्षभरात याची तपासणी होत नसल्यामुळे याचा फायदा काही दुकानदार उचलत आहेत. यामुळे गैरप्रकार वाढले आहेत. शहर विभागात दोन निरीक्षक, दोन लिपिक व गोदाम व्यवस्थापकाची पदे रिक्त आहेत. नायब तहसीलदारांसाठी असणारे व्यवस्थापक पद लिपिकाकडे देण्यात आले आहे.
त्यामुळे नियमित तपासणीही अपूर्ण रहात आहे. अन्न सुरक्षा योजनेच्या धान्य वितरणात सध्या खूपच अनियमितता दिसत आहे. रॉकेलच्या वाटपातही अनियमितता दिसत आहे. केवळ दोन दिवस उशिरा रॉकेल मागण्यास जाणाऱ्यांना रॉकेल संपल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
दुकानांची तपासणी ही नियमितपणाची आहे. कर्मचारी वर्ग कमी असल्यामुळे तपासणीस विलंब होत आहे. येत्या पंधरवड्यात सर्व दुकानांची तपासणी पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. डिसेंबर महिन्याचे धान्य उचलण्यात आले असून, उद्यापासून त्याचे वितरण सुरु करण्यात येईल.
- विलास डुबल, अन्नधान्य वितरण अधिकारी, सांगली
जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना संघटना पाठीशी घालणार नाही. गोरगरिबांचे अन्न कुणी काढून घेत असतील तर, ते अक्षम्य आहे. जर विनाकारण कारवाई होत असेल तर, आम्ही त्याबाबत जाब विचारू.
- मुन्ना कुरणे, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष