जिल्ह्यात दररोज १५० रुग्णांची १०८ रुग्णवाहिकेला मदतीसाठी हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:27 IST2021-04-20T04:27:40+5:302021-04-20T04:27:40+5:30
सांगली : कोरोना महामारीच्या काळात १०८ रुग्णवाहिकेने दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. गेल्या वर्षभरात १ लाख ४० हजार रुग्णांना ...

जिल्ह्यात दररोज १५० रुग्णांची १०८ रुग्णवाहिकेला मदतीसाठी हाक
सांगली : कोरोना महामारीच्या काळात १०८ रुग्णवाहिकेने दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. गेल्या वर्षभरात १ लाख ४० हजार रुग्णांना तातडीची मदत देत रुग्णालयात पोहोचविले आहे, त्यामध्ये ८ हजार ८९९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
रुग्णाला रुग्णवाहिकेत घेतल्यापासून रुग्णालयात पोहोचविण्यापर्यंतचा काळ म्हणजे गोल्डन पिरीयड ठरतो. रुग्णाला योग्य उपचार मिळेपर्यंत रुग्णासोबतच रुग्णवाहिकेतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्याही जिवात जीव नसतो. गेल्या वर्षभरात झोकून देऊन काम करताना १०८ सेवेने सव्वा लाखांहून अधिक रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. अपघाताचे १५ हजार ५३६, प्रसुतीचे ३२ हजार ४३३, विषबाधेचे ५ हजार २१२, जळीताचे ५१२, तातडीच्या वैद्यकीय मदतीचे ७२ हजार ६९७, हृद्यविकाराचे २०४ रुग्ण रुग्णालयात पोहोचविले आहेत. आकस्मिक दुर्घटनेचे ५१७, विजेच्या धक्क्याचे १८०, उंचावरून पडल्याचे ३९८ व इतर दुर्घटनांच्या ६ हजार ४२२ रुग्णांना मदत दिली आहे. तर कोविडबाधित ८ हजार ८९९ रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे.
कोरोना काळात तर १०८ रुग्णवाहिका सेवा अत्यंत जोखमीची कामगिरी बजावत आहे. बाधित रुग्णांना अन्य कोणतेही वाहन स्वीकारण्यास तयार नसल्याच्या काळात ही सेवा जीवनदायी ठरली आहे. बाधित रुग्णाला हाताळताना रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनाही बाधा होण्याची भीती आहे. पण त्यासाठी पीपीई कीट, प्रत्येकवेळी रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण, मास्कचा पुरेपूर वापर इत्यादी सूचनांचे पालन केले जाते. त्यामुळे रुग्णसेवा अखंड सुरू असल्याचे जिल्हा समन्वयक डॉ. कौस्तुभ घाटुळे यांनी सांगितले.
पॉईंटर्स
कोणत्या महिन्यात किती रुग्णांची वाहतूक ?
जानेवारी - कोरोना ४७, इतर १८५६
फेब्रुवारी - कोरोना २८, इतर २५३६
मार्च - कोरोना १६४, नॉनकोविड -२५३१
- जिल्ह्यात एकूण १०८ रुग्णवाहिका - २४
- दररोज येणारे कॉल्स
शहरातून ३० टक्के
ग्रामीण ७० टक्के
चौकट
कॉल केल्यावर तातडीने रुग्णवाहिका हजर
- १०८ क्रमांकावर मदतीसाठी काॅल केल्यावर दोन मिनिटांत चालकाला निरोप मिळतो. रुग्णवाहिका लगेच निघते. अंतरानुसार पंधरा मिनिटे, अर्ध्या तासाच्या आत रुग्णापर्यंत पोहोचते असा अनुभव आहे.
- कोरोना महामारीच्या काळात पुरेपूर काळजी घेऊनही या रुग्णवाहिकेवरील सहा वैद्यकीय अधिकारी व तीन चालक गेल्या वर्षभरात कोरोनाबाधित झाले. उपचार घेऊन ते पुन्हा ड्युटीवर जॉईन झाले. रुग्णवाहिकेवरील सर्वांची वेळोवेळी कोरोना चाचणी घेतली जाते.
- काहीवेळे चेष्टा मस्करी म्हणून केलेल्या कॉलचाही उपद्रव होतो. अशावेळी संबंधिताला कडक ताकीद दिली जाते, प्रसंगी पोलिसांनाही कळविण्याची वेळ येते. पण सांगली जिल्ह्यात तसे प्रसंग अत्यंत अपवादात्मक आहेत.
चौकट
ग्रामीण भागातून १०८ रुग्णवाहिकेला मागणी
महापालिका क्षेत्रात तसेच जिल्ह्याच्या शहरी भागात मोठमोठी रुग्णालये असल्याने तेथून १०८ रुग्णवाहिकेला फारसे कॉल येत नाहीत. पण ग्रामीण भागातून मात्र कॉलचे प्रमाण जास्त आहे. दररोज सरासरी सव्वाशे ते दीडशे कॉल येतात. गेल्या वर्षभरात कोरोनाबाधितांसाठी कॉल वाढले आहेत.