सांगली : लॉकडाऊनमुळे घराबाहेरही पाऊल ठेवणे मुश्किल असलेल्या काळात ‘डायल १०८’ रुग्णवाहिकेने एका बाळाला घेऊन मुंबईपर्यंतचा प्रवास केला. त्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया झाल्याने त्याचे प्राण वाचू शकले. करोली एम,( ता. मिरज) येथील राहुल चव्हाण यांच्या बाळाला नवसंजीवनी मिळाली.१६ मार्चला जन्मल्यावर काही दिवसांतच बाळाचे अंग निळे पडू लागले.
सांगलीच्या शासकीय रुग्णालयात त्याला दुर्मिळ स्वरूपाच्या हृदयविकाराचे निदान झाले. त्यावरील शस्त्रक्रियेसाठी तातडीने मुंबईला नेण्याचे ठरले. पण लॉकडाऊनमुळे खासगी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हत्या. डायल १०८ ही रुग्णवाहिका जिल्ह्याबाहेर नेता येत नव्हती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी विश्ोष बाब म्हणून माहिती १०८ सेवेच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्यानंतर परवानगी मिळाली.त्यानंतर ७ मे रोजी सहा जिल्ह्यातून रुग्णवाहिकेने बाळाला मुंबईतील रुग्णालयात दाखल केले.