द्राक्षबाग कोसळून दहा लाखांची हानी
By Admin | Updated: February 6, 2015 00:41 IST2015-02-06T00:32:37+5:302015-02-06T00:41:19+5:30
मणेराजुरीतील प्रकार : जोरदार वाऱ्याने दीड एकरातील मंडप भुईसपाट

द्राक्षबाग कोसळून दहा लाखांची हानी
मणेराजुरी : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील भीमराव नारायण जमदाडे यांची दीड एकरातील द्राक्षबाग जोरदार वाऱ्याने कोसळून भुईसपाट झाली. या दुर्घटनेत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. हा प्रकार आज गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.भीमराव जमदाडे यांची मणेराजुरी (रामलिंगनगर) येथे सोनाक्का जातीच्या द्राक्षांची दीड एकरात बाग आहे. द्राक्षबागेसाठी त्यांनी आतापर्यंत सहा लाख रुपये खर्च केला आहे. या बागेमध्ये सात हजार पेटी इतकी द्राक्षे पक्व झाली होती. या दर्जेदार आणि भरघोस द्राक्ष उत्पादनाची परिसरात चर्चा होती.गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास जोरदार वाऱ्याने बागेचे आधारक (स्टे) तुटून संपूर्ण द्राक्षबाग भुईसपाट झाली. त्यामुळे बागेतील द्राक्षघड पूर्णपणे जमिनीवर आपटले. बहुतांश घड आणि मणी फुटले आहेत. लोखंडी मांडव वाकला आहे. हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागेचे नुकसान झाल्याने जमदाडे कुटुंबीय हताश झाले आहे. द्राक्षबाग कोसळल्याचे समजताच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. तलाठी विक्रम कांबळे यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे. (वार्ताहर)