पेठ येथे दहा लाखांची शोभेची दारू जप्त
By Admin | Updated: October 31, 2015 23:59 IST2015-10-31T23:50:51+5:302015-10-31T23:59:28+5:30
गुन्हा दाखल : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

पेठ येथे दहा लाखांची शोभेची दारू जप्त
सांगली : पेठ (ता. वाळवा) येथील कोळेकर गल्लीतील सुरेश तुकाराम पेठकर याच्या जुन्या घरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा टाकून सुमारे दहा लाखांचा शोभेच्या दारूचा साठा जप्त केला. पेठकर याने विनापरवाना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शोभेच्या दारूचा साठा करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोभेच्या दारूचा स्फोट होऊन अनेकांचा बळी गेल्याच्या घटना कवठेएकंद (ता. तासगाव) येथे घडल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक विक्रेते विनापरवाना फटाक्यांचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांना मिळाली होती. त्यामुळे फुलारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला कारवाईचे आदेश दिले होते. पेठ येथील सुरेश पेठकर याने कोणताही परवाना न घेता मोठ्या प्रमाणात शोभेच्या दारूचा साठा केला असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री दहा वाजता कोळेकरच्या जुन्या घरावर छापा टाकला. या छाप्यात दहा लाखांचा शोभेच्या दारूचा साठा आढळून आला. हा साठा जप्त करण्याची कारवाई शनिवारी पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होती. पेठकर याच्याविरुद्ध इस्लामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करून पथक दुपारी सांगलीत दाखल झाले. जप्त केलेला साठा इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. तसेच पुढील तपास त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पेठेकर हा मोठा विक्रेता असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या कारवाईत सहायक फौजदार शरद कुरळपकर, राजू कदम, हवालदार अशोक जाधव, राजू कोळी, राजू नलवडे, संदीप मोरे, मेघराज रूपनर, अमित परीट, शशिकांत जाधव, विकास भोसले व किशोर काबुगडे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)