Yogguru Nanamal grandmother become world famous for her devotion and love about yoga | योगमय नानम्मल आजी
योगमय नानम्मल आजी

 ननम्मल या 98 वर्षांच्या आजीबाईंना भेटायला मी  बंगळुरु-सेलम-कोइमतूर अशी मजल मारत पोहोचलो.  
 मी गेलो तेव्हा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या बातम्या ताज्या होत्या. आणि त्यातही एक फोटो बंगळुरूचा! काही केंद्रीय मंत्री, कर्नाटक सरकारचे मंत्री, अण्णा हजारे यांनी तिथल्या शाळकरी मुलांबरोबर योगासनांचा कार्यक्रम केला होता. पण त्याच व्यासपीठावर दोन आजीबाई होत्या. एक नव्वदी उलटलेली अमेरिकन आजी आणि दुसरी 98 वर्षांची ननम्मल. या दोघी जगातल्या सगळ्यात वयोवृध्द योगगुरू आहेत. बंगळुरूच्या त्या कार्यक्रमात या दोघींनी इतर सगळ्यांपेक्षा अत्यंत अचूक, तालबध्द आणि फटाफट वेगानं योगासनं घालून दाखवली होती.
- त्याच त्या ननम्मल- योगा आज्जी! अत्यंत चपळ. सडसडीत देहयष्टी. योगासनांसाठी वळणारं-वाकणारं शरीर आणि प्रसन्न मुद्रा. खुदूखुदू हसणं तर ठार सुंदर!
आजींना शोधत गेलो, तर गुगलबाबानं त्यांच्या कहाण्याच कहाण्या सांगितल्या. आणि हेही की कोईमतूरला आज्जींची ओझोन योगा सेंटर नावाची एक संस्था  आहे. त्या संस्थेचा कारभार आज्जींचा मुलगा पाहातो. बालकृष्णन त्यांचं नाव. कोइमतूरला पोहोचायच्या आधी त्यांना फोन केला तेव्हा ते उत्साहानं म्हणाले होते, कधीही या. आईची भेट घडवून आणतो. 
     लांबवर पसरलेल्या ऐसपैस कोइमतूरच्या एका भागात हे ओझोन सेंटर आहे. सकाळीच त्यांच्या संस्थेत जाऊन थडकलो. दुस-या मजल्यावर एकदम साधा कोबा केलेली जागा. त्याच्या एका भागात योगासनं शिकवायचा हॉल आणि दुस-या भागात बालकृष्णन राहतात. मी जाताच एकदम सडसडीत बांध्याचा, अगदी अंगाबरोबर वजन असणारा माणूस समोर आला. 
वेलकम सार, आय अँम बालाकृष्णन.
इतक्या लांबून आपल्याला भेटायला आलेल्यांचं स्वागत करण्याची गृहस्थांना चांगलीच सवय असावी. ननम्मल आजींना शोधत हल्ली देश-विदेशातले पत्रकार येतात कोईमतूरला. 
व्हेअर इज ननम्मल. असं विचारलं, तर ते लगेच म्हणाले, इट्स नानम्मल. अम्मल मिन्स मदर. आई कालच माझ्या धाकट्या भावाकडे राहायला गेलीय आपण तिकडे जाऊच पण तोपर्यंत इथल्या हॉलमध्ये थोडावेळ बसू.’’
 त्यांच्याबरोबर शेजारच्या योगासनाच्या हॉलमध्ये गेलो. बालकृष्णन अखंड बोलत सुटले होते. बोट धरुन नेल्यासारखं त्यांनी आधी चारही भिंतींवरचे फोटो दाखवले. नानम्मल यांना भरपूर पुरस्कार मिळाले होते. त्याचे फोटो सगळीकडे लावलेले. त्यांच्यावर प्रसिद्ध झालेले लेखही फ्रेम करुन लावलेले. नानम्मल यांच्या घरात एकूण तब्बल 36 योगशिक्षक आहेत. त्यांना 6 मुलं, 12 नातवंडं आणि 11 पतवंडं असं जबरदस्त मोठं कुटुंब आहे. हे सगळे लोक लहानपणापासूनच योगासनं शिकतात आणि नंतर इतरांना शिकवतात. त्यामुळे सगळे जावई-मुली, मुलींच्या सासरचे लोकही योगासनं शिकवतात. त्या सगळ्य़ांचे फोटो होते.
मी आधी वाचलेल्या लेखात नानम्मल यांचं वय 96 वाचलेलं म्हणून त्यांना विचारलं,  ‘शी इज नाईन्टीसिक्स इयर्स ओल्ड ना ?’’
 त्यावर ते एकदम हातवारे करत जोरात म्हणाले, अय्यो, व्हाट आर यू रिडिंग सार. शी इज नाइंटीयेट्ट.. आय क्यान शो यू हर पासपोर्ट अल्सो.. 
म्हटलं ओके.
या फोटोकडून त्या फोटोकडे अशी शिवाशिव चाललेली असताना मध्येच त्यांची पत्नी दोन पेले घेऊन आली. 
- त्यातलं गढूळ पाणी बघून मी थांबलो आणि बालकृष्णन यांच्याकडे बघितलं. ते म्हणाले,
  ‘ड्रींक्क.’
-  मग निमूट प्यालो. थोडं गोडसर लागलं. 
म्हटलं हे कसलं पाणी.?
तर त्यांनी सांगीतलं,  ‘ धिस इज हानी अँड वाटर.. आम्ही घरातले सगळे रोज मध घातलेलं पाणीच पितो. नानम्मलनीसुद्धा आयुष्यात कधीही चहा-कॉफी घेतलेली नाही.’’
- म्हटलं वा! हा चांगला पर्याय आहे. 
 तिथे बराच वेळ गेल्यावर म्हटलं, चला, आता आपण नानम्मलना भेटायला जाऊ!
बालकृष्णन यांचा भाऊ तिथून काही किलोमीटर्स लांब राहातो. तोही योगासन आणि आयुर्वेदिक उपचारांची एक वेगळी संस्था चालवतो. 
आम्ही निघालो नानम्मलना भेटायला. वाटेत बालकृष्णनना विचारलं,  ‘नानम्मलना हिंदी-इंग्लिश थोडंतरी समजतं का?’
 ते म्हणाले,  ‘आजिबात नाही. आम्ही मुळचे तेलगू आहोत. नायडू.. चंद्राबाबू नायडूवाले नायडू. चारशे वर्षांपुर्वी आंध्रातल्या राजवटीला कंटाळून मोठय़ा संख्येनं तेलगू लोक कोइमतूरला येऊन स्थायिक  झाले.  इतकी वर्षं इथल्या सगळ्य़ा कापडगिरण्या, उद्योग त्यांचेच होते. त्यामुळे आमची मोठी कम्युनिटी येथे राहते. त्यामुळे आम्ही घरात तेलगू, बाहेर तमिळ बोलतो. आमच्या वडिलांनी केरळमध्ये शेती घेतली होती त्यामुळे आम्हाला मल्याळमसुद्धा येतं. 
- हे सगळं चाललेलं असताना त्यांच्या भावाचं घर आलं. यांच्या घरात इतक्या भाषांची सरमिसळ आहे म्हटल्यावर आता पुढे बोलताना होणारी संभाव्य गंमत डोळ्य़ासमोर येऊ लागली.

 


    बाहेरच नानम्मल बसल्या होत्या. फोटोत पाहिलेली त्यांची फिकट गुलाबी रंगाची साडी पाहिल्यावर त्यांना चटकन ओळखता आलं. अगदी लहान कुडी, पांढरे केस, कपाळावर भस्माचा जाड पट्टा अशा त्या खुर्चीत बसलेल्या होत्या. गेल्यागेल्या नमस्कार केल्यावर त्यांनी लांबलचक पोटभर आशीर्वाद दिला. बालकृष्णन यांनी ओळख करुन दिल्यावर त्यांनाच दुभाषा करून गप्पा सुरू झाल्या.
 नानम्मल सांगत होत्या,  ‘मी वयाच्या तिस-या वर्षीच योगासनं शिकू लागले. माझ्या आजोबांनी मला हे शिकवलं. त्यानंतर आमच्याकडे साधारण याच वयात सगळे योगासनं करायला लागतात.’’
अगदी न राहवून आज्जींना विचारलंच मी,  ‘ तुम्ही इतकी वर्षे योगासनं केली म्हणून फिट असालच पण तुम्ही खाता तरी काय नक्की..?’
नानम्मल हसल्या आणि म्हणाल्या,  ‘मी सकाळी वेगवेगळ्य़ा धान्यांची कांजी आणि हिरव्या भाज्या खाते. दुपारी भात आणि शेवग्याचा पाला आणि रात्री फक्त एक कप दुध आणि एक केळं!’
झालं. एवढंच. 
नानम्मल साखर आजिबात खात नाहीत.
    शेवग्याचा पाला कशाला खाता असं विचारल्यावर बालकृष्णन यांनीच आईचं उत्तर परस्पर दिलं.. शेवग्याचा पाला सर्वात चांगला.पोट साफ होतं. बद्धकोष्ठावर अक्सीर इलाज. आमच्या सगळ्य़ांच्या जेवणात रोज शेवग्याचा पाला असतो. रिच सोर्स ऑफ फायबर्स. मुलींना पाळीच्या काळात होणारा त्रास कमी होण्यासाठीही त्याचा चांगला उपयोग होतो. शेळ्या-मेंढय़ासुद्धा पोट दुखल्यावर शेवग्याचा पाला खातात.’
बोलताबोलता जवळ येऊन हळूच एकदम खालच्या आवाजात माझ्या कानात म्हणाले, इट्स गुड फॉर अवर स्पर्म्स अल्सो.
     नानम्मल खुदूखुदू हसत बसल्या होत्या. त्यांची कहाणी चालूच होती. त्या सांगत होत्या,  ‘‘माझी आईसुद्धा दीर्घायुषी होती. 107 वर्षे जगली. शेवटच्या दिवसापर्यंत ती स्वत:ची कामं करत होती. मी तिच्याप्रमाणेच जगते. ती करायची तशी मी सुद्धा दिवसातून दोनदा थंड पाण्यानं आजही अंघोळ करते. अजून मला चष्मा लागलेला नाही. पहिल्या प्रयत्नात सुईमध्ये दोरा ओवू शकते एवढे डोळे चांगले आहेत. कानाला व्यवस्थित ऐकू येतं. मी आजपर्यंत कधीही दवाखान्यात  गेलेली  नाही.’’
- नानम्मलचं एकेक बोलणं थक्क करायला लावत होतं. एक झालं की त्याच्या पुढचं त्याच्याहून आणखीच काहीतरी मोठं दिव्य वाटावं असं असायचं.
थोड्यावेळानं बालकृष्णनची पुतणी आली. ती आल्यावर ते म्हणाले,  ‘आता आम्ही योगासनं करुन दाखवतो.’’
त्यांच्या क्लासेसमध्ये आसनं सुरु करण्यापुर्वी मातृदेवो भव, पितृदेवो भव अशी लहानशी पार्थना हात जोडून केली जाते. त्या दोघांनीही ती प्रार्थना केली आणि लगेच अंगणात सतरंजी पसरून ते एकेक आसनं करु लागले. 
थोड्या वेळानं त्यांनी नानम्मलना आसनं करायला सांगितल्यावर त्याही सतरंजीवर उभ्या राहिल्या. त्यांनी पुन्हा प्रार्थना केली आणि हात जोडले. नमस्कार करुन हळूहळू खाली वाकून गुडघ्यांना नाक टेकवलं. एखाद्या जिम्नॅस्टचं शरीर वळावं इतक्या सहज त्यांच्या हालचाली होत होत्या. नेमक्या. सुबक आणि लयीत. वज्रासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन, हलासन अशी एकेक आसनं सुरू झाली.
सकाळी आम्ही आलो तेव्हा त्या जोरजोरात खोकत होत्या. कफही चांगलाच झालेला दिसत होता आणि बोलताना एकूणच त्यांची तब्येत नरम वाटत होती. म्हणून मी त्यांना थांबवलं. आमच्यासाठी आता आजिबात आसनं करु नका प्लीज, आज आराम करा म्हटल्यावर त्या आणि बालकृष्णन थांबले. 
नानम्मल आता वयानुसार जरा थकलेल्या दिसतात. या वयातसुद्धा त्या लांबलांब कार्यक्रमाला जात असतात. थोड्या वेळानं आमच्या  पुन्हा गप्पा सुरू झाल्या.
 नानम्मल सांगत होत्या, फार घाम येईपर्यंत, थकवा येऊन बसावं लागेल इतके सूर्यनमस्कार एकावेळी घालणं एकदम चूक आहे. लहान वयात 30 पेक्षा जास्त नमस्कार नकोत आणि नंतर फक्त 12 नमस्कारच घातले पाहिजेत. हे पॉवरयोगा वगैरे काही ठिक नाही.’’
 नानम्मल सध्या योगासनांच्या नावावर चाललेल्या बाजारावर थोड्या नाराज दिसल्या.  भारतामध्ये प्राचिन काळापासून चालत आलेली योगासनं ती ही नव्हेत असं त्या बोलून दाखवतात. पण त्यात कोठेही त्रासिकपणा, आढय़ता, खोचकपणा, राग असं काहीच नव्हतं. नानम्मल अगदी साध्या शब्दांमध्ये त्यांना वाटणारं योगासनांचं महत्त्व सांगत होत्या,
 आमच्या घरात कोणालाही बीपी, शुगरचा त्रास नाही. योगासनं केली की तुमच्या सलायव्हा, थायरॉइड ग्लॅंड्सचं काम उत्तम होतं. मग तुमचे पॅन्क्रीआज निरोगी राहतं आणि मग साखर वाढत नाही. आमच्या घरात कुणाचंही बाळंतपण सिझेरियननं झालेलं नाही.’’ 
नानम्मलना मध्येच अडवून बालकृष्णननी मलाच प्रश्न विचारला, 
 ‘तुझ्या आजीला किती मुलं होती?’
 मी म्हटलं,  ‘‘ आठ.’’
 ते म्हणाले,  ‘‘ त्यावेळेस डिलिव्हरीला किती खर्च आला असेल?’’
म्हटलं,  ‘‘कदाचित शून्यच.’’
तो धागा नानम्मलनी उचलला. म्हणाल्या,  ‘‘ बघ, त्यावेळेस इतकी मुलं होऊन पण सगळी नॉर्मल डिलिव्हरी असायची. एक रुपयाचा खर्च यायचा नाही. आता कोइमतूरमध्ये साधं बाळंतपण करायचं झालं तर तीस हजार खर्च येतो, सिझेरिन असेल तर त्याहून जास्त. टेस्ट ट्यूब किंवा इतर उपचार असले तर मग विचारुच नका. गेल्या पन्नास वर्षात ही सगळी परिस्थिती झपाट्यानं बदलली आहे. फार वाईट वाटतं. पण मी म्हातारी बाई. मी काय करू शकणार?’’
    शाळेमध्येच मुलांना आसनं, नमस्कार शिकवायला हवेत. जर शाळांमध्ये शंभर-दोनशे मुलांमागे एक योगासन शिक्षक असं प्रमाण ठेवलं तर नव्या शिक्षकांची गरज निर्माण होईल, रोजगार मिळेल आणि तरुण इकडे नोकरीसाठी वळतील. आम्ही लहान मुलांसाठी योगासनाच्या स्पर्धा भरवतो. असं स्पर्धा-बक्षिसं वातावरण असलं की मुलांमध्येही उत्साह येतो.’’
-    बालकृष्णन आणि नानम्मल यांनी सांगितलेल्या माहितीमध्ये खरंच तथ्य होतं. गेल्या काही वर्षांमध्ये योगासनांवरच त्यांचं घर चाललंय. पैसेही ब-यापैकी येतात म्हणाले. पण सगळ्य़ांचे कपडे आणि राहणी अत्यंत साधी होती. भपका वगैरे शब्द इथे गैरलागूच होते. निर्व्यसनी, निरोगी आयुष्य किती आनंदात आणि साधेपणात जगता येतं याचं ते कुटुंब उत्तम उदाहरण वाटलं. खरंतर ते साधेपण जरा अंगावरच येत होतं. आयुष्यभर इतक्या कडक शिस्तीत राहणं किती कठीण आहे, हे जाणवत होतं. नानम्मल आणि बालकृष्णन योगासनं करताना पाहत बसलो होतो, तेव्हा मनात मी सारखी त्यांची आणि स्वत:ची तुलना करून पाहत होतो. नानम्मलनी कसलेही कष्ट न होता अगदी सहज नाक गुडघ्याला टेकवलं. तेव्हा तर स्वत:ची लाजच वाटली. एवढीशी कुडी मिळालेली शंभरीची बाई चटाचट हलतेय आणि आपण सकाळी उठायलाही कंटाळा करतो असले विचार त्रास द्यायला लागले. 
निघताना नानम्मलच्या पुढे वाकलो. त्यांना नमस्कार केला, तेव्हा डोळ्यात पाणीच आलं. मनात म्हटलं , आजी आशीर्वाद द्या मला. माझ्या सगळ्या पिढीलाच!

- दीपोत्सव प्रतिनिधी

Web Title: Yogguru Nanamal grandmother become world famous for her devotion and love about yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.