Who along with you? | सोबत कोण?
सोबत कोण?

-अश्विनी बर्वे

अहंकाराचा वारा न लागो राजसा।
माझिया विष्णुदासा भाविकांसी।।
    नामा म्हणे तया असावे कल्याण। 
    ज्यामुखी निधान पांडुरंग ।।

लहानपणी कीर्तनाला गेले की, हा अभंग सर्वात शेवटी म्हटला जायचा. तो असा ऐकून ऐकून पाठ झाला होता. यातील कोणत्याही शब्दाचा अर्थ त्यावेळी जाणून घ्यावा, असं मला वाटलं नाही. त्यामुळे त्याओळी मनात तशाच राहिल्या. आज इतक्या वर्षांनंतर वारीला गेल्यावर त्या शब्दांचा अर्थ कळतोय. उमजतोय. वारी करायचीच हे माझं पक्क होतं. ज्या ज्यावेळी मी वारीचा विषय काढायचे तेव्हा सगळेच जण तेथील घाण, अंघोळीची गैरसोय आणि अशा इतर बर्‍याच गोष्टी मला सांगत. अर्थात, या सगळ्यांनी वारी कधीच केलेली नव्हती. 

आपण वारी करावी असं मी ठरवलं. नाव नोंदवलं तेव्हा त्या महाराजांनी विचारलं, ‘सोबत कोणी नाही का तुमच्या ओळखीचं?’ मी म्हटलं  ‘नाही.’
आज जेव्हा मी हे लिहायला बसले तेव्हा मला आठवलं की जेव्हापासून मी वारीसाठी दिंडीत नाव नोंदवलं तेव्हापासूनच मी आनंदात होते. मला प्रत्येक गोष्टीत गंमत वाटत होती. म्हणजे कोणी मला म्हटलं की ऊन असेल तर काय कराल हो तुम्ही? मी काही उत्तर द्यायचे नाही. 

पण मनातल्या मनात मी आता चालतेच आहे असं वाटायचं. मी कल्पनेनं कितीवेळा अशी ऊन-पावसात चालली असेल? माहीत नाही.
पण माझ्यात वारक-यामध्ये असलेला संपूर्ण समर्पणाचा भाव येणार होता का? आणि कसा येईल? याबाबतीत मला धास्ती वाटत होती. मला काहीतरी अधिक समजतं आहे याची पुसटशी जाणीवही मला नको होती आणि ती माझ्या आतून निपटून निघणं हीच माझी मनाची वारी होती. ती खूप कठीण होती. आपणच आपल्याला तपासात राहायचं. सतत स्वत:ला पिंज-यात उभं करायचं. यात मी खूप दमत होते. हा विचार आपण कोणाला आणि कसा सांगू शकतो? म्हणजे पायी चालणं ही शारीरिक वारी आणि मनाला शिस्त लावणं ही मानसिक वारी. 

आम्ही सासवडला पोहोचलो तेव्हा ते गाव वारक-यानी व्यापलं होतं. आम्ही आमच्या मुक्कामाच्या जागी गेलो. तिथे गीतेचं पठण चालू होतं. आपापल्या सामानाजवळ लोकांनी एक छोटं बसकर टाकलं होतं. मी तशीच फरशीवर बसले, तर मागून कोणीतरी मला त्यांच्या शेजारी बसण्याची खूण केली. मी लगेच गेले. 

मला संस्कृत अजिबात येत नाही. त्या बाईंची पूर्ण गीता पाठ. मी त्या जशा म्हणतील तसं म्हणायला लागले. रोज त्या पूर्ण गीता म्हणत. त्यानंतर रोज रात्री  त्या मला शोधत येत आणि हाक मारून गीता म्हणायला घेऊन जात. मीही जात असे. काही काही शब्द मी बिनचूक म्हणू लागले तेव्हा त्यांनी मला एक डिंकाचा लाडू दिला. 

माझे खूप लाड झाले. त्यांनी मला सांगितलं की आपण माहेरी चाललो आहोत, बिनधास्त राहा. काय ओझं असेल ते टाकून दे. मीही मान डोलावली. बघा दुस-याचं ऐकायचं ठरवलं की कसं फळ मिळतं. मराठवाड्यातून खूप मंडळी आली होती वारीला. काहीजण विदर्भातून आणि खान्देशातून आले होते. एक बाई  नाशिक जिल्ह्यातील सटाण्याहून आल्या होत्या. त्यांचं सासर औरंगाबाद होते. मी नाशिकची म्हटल्यावर त्यांना माहेर भेटल्या सारखं झालं. त्या दहा वर्षांपासून वारी करत आहेत. परत परत वारी करावीशी का वाटली, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, अहो जून महिना आला की आपोआपच मी बॅग भरायला लागते. कामं संपवते, पावलं ओढ घेतात आणि मग काय निघतेच.’ 
तिनं मला विचारलं, ‘तू का आलीस?’

मी म्हटलं,  ‘तुम्ही कोणत्या प्रेरणेनं चालतात हे बघायला आले बस.’ पुणे-सासवड चालून आलेली मंडळी खूप दमली होती. संपूर्ण घाटात भरपूर पाऊस होता. तरीही आम्ही मजेत चालत होतो. रस्त्यांवर पडणारी माणसांची वळणं बघून खूप छान वाटत होतं. 

आपल्या पुढे-मागे माणसंच माणसं. मग या वारीच्या बाहेर काही जग आहे आणि तिथे कशा कशावर वाद चालू आहे. 
हे सर्व मी विसरलेच. 
अर्थात, वारीतल्या वातावरणानं मला ते विसरायला लावले.

ashwinibarve2001@gmail.com


Web Title: Who along with you?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.