Is it easy to be live septertate after sixty? | वेगळं होणं परवडणार  आहे का?

वेगळं होणं परवडणार  आहे का?

-अँड. जाई वैद्य

प्रौढवयातली जोडपी आमचं एकमेकांशी पटत नाही किंवा आता जुळवून घेणं अशक्य असं म्हणत घटस्फोटासाठी कोर्टाची पायरी चढतात. चाळिशी-पन्नाशीनंतर घटस्फोट होत आहे. प्रमाण कमी असलं तरी साठी गाठलेली जोडपीही घटस्फोट घेतात.  
वयाच्या या टप्प्यात लग्नाचं नातं चांगलं मुरलेलं असतं मग घटस्फोटापर्यंत पोहोचतील एवढे वाद का व्हावेत, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण खरं तर वाद नव्यानं निर्माण झालेले नसतात. जे वर्षानुवर्षे दाबून ठेवलेलं असतं तेच उफाळून आलेलं असतं. मुलं मोठी झालेली असतात. आई-वडिलांमधले वाद, समस्या तेही समजून घेऊ शकतात. आई-वडिलांनी भांडत बसण्यापेक्षा आनंदानं वेगळं राहण्यात त्यांनाही गैर काही वाटत नाही. वयाच्या या टप्प्यावर मुलांच्या किंवा घराप्रति महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडून झालेल्या असतात. करिअर सेट झालेलं असतं. आर्थिक बाजूही स्थिर झालेली असते. मग  ‘आता नाही पटत एकमेकांशी तर होऊ वेगळं’ असा विचार करण्याची योग्य वेळ हीच आहे असं वाटत असतं. 
पण कोर्टात घटस्फोटाची जेवढी प्रकरणं येतात तेवढय़ाच जोडप्यांमध्ये विसंवाद असतो असं नाही, तर अनेक जोडपी कोर्टाची पायरी चढणं परवडणार नाही म्हणत आपापसांत परस्परसंमतीनं वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. किंवा अनेकजण कोर्टाची पायरी चढल्यानंतरही एकमेकांमध्ये शांततेनं, सामंजस्यानं काही मार्ग निघू शकतो याचा अंदाज आल्यावर परत मागे फिरतात. 
घटस्फोट का होतात? तर त्यामागे असतो छळ. आपल्या कायद्यात ‘छळ’ या शब्दाची नेमकी  व्याख्या नाही. अमूक एक म्हणजेच छळ असं नाही. त्यामुळे शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक कारणांसाठीच छळ होतो असं नाही आणि असा छळ झाल्यास त्यालाच छळ म्हणतात असं नाही. एकमेकांच्या सोबत राहताना आपलं मूळ व्यक्तिमत्त्वं दाबून टाकावं लागणं, आपले छंद, कला, आवडी-निवडी जोपासता न येणं, जोडीदाराचा दबाव वाटणं, जोडीदाराच्या सहवासात कोंडमारा होणं.. या सगळ्याचा छळातच समावेश होतो. 
हा छळ वयाच्या एका टप्प्यावर काही कारणांसाठी सोसला जातो, सोसावा लागतो. हा छळ सोसून जोडीदारासोबत तडजोड करावी लागते. पण वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यावर मात्र छळ नकोसा होतो. आता बास, किती दिवस हे सहन करायचं? दोन पैसे कमी येतील पण  मला माझं आयुष्य शांततेनं, आनंदानं आणि मनाप्रमाणे जगायचं आहे.  असं म्हणत या टप्प्यावर जोडपी वेगळं होण्याचा निर्णय घेतात. यात चांगलं-वाईट, चूक किंवा बरोबर, कुटुंब आणि समाजाचं नुकसान हे मुद्दे महत्त्वाचे नसतात. एकमेकांना होणारा त्रास हाच इथे मुख्य असतो. या त्रासातून मुक्त होण्यासाठी कायदेशीर घटस्फोट किंवा परस्पर सहमतीनं शांततेनं जगण्याचा तोडगा स्वीकारला जातो. घटस्फोट हा चाळिशी, पन्नाशी किंवा साठीतच का, आधी का नाही सूचला हा मार्ग, असा प्रश्नही पुढे येतो. पूर्वी न परवडणारा घटस्फोट एका टप्प्यावर परवडू लागतो हे त्यावरचं उत्तर. मूलं लहान आहेत, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, घरातली जेष्ठांची जबाबदारी, पोटगी देणं न परवडणं, चांगली नोकरी नसणं, घटस्फोटानंतर राहण्यासाठी वेगळं घर घेणं न परवडणं, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसणं, आर्थिक पाठबळ नसणं या अनेक कारणांमुळे नात्याचा जाच होत असला तरी स्री-पुरुष तडजोडीचाच मार्ग स्वीकारतात.  अर्थात अनेकांच्या बाबतीत ही परिस्थिती त्यांच्या प्रौढत्वातही बदलत नाही. मुलांची लग्नं झाल्यानंतरही नवरा-बायकोचं पटत नाही. रोजचे वाद सुरूच असतात. पण दुसरं घर कुठे घेणार, वेगळं निघून कुठे जाणार, आपण आजारी पडल्यानंतर आपल्याकडे कोण बघणार, हे प्रश्न समोर येतात आणि मारून, मुटकून परिस्थितीशी आणि जोडीदाराशी तडजोड करण्याशिवाय अनेकांकडे पर्यायच शिल्लक राहत नाही. म्हणूनच घटस्फोटाचे अर्ज दाखल करणार्‍यांचे, घटस्फोट घेणार्‍यांचेच फक्त सहजीवन विस्कळीत असतं असं नाही; पण घटस्फोट हा पर्याय न परवडणारे आणि शांततेत आपापसांत वाद मिटवणारेही खूप असतात. घटस्फोट घेणं, विभक्त होणं या मुद्दय़ाला चिकटलेली आर्थिक बाजू खूप महत्त्वाची असते. आर्थिकदृष्ट्या आपल्याला घटस्फोट घेणं, वेगळं राहणं परवडणार आहे का, असा विचार स्री-पुरुषांना करावाच लागतो. आर्थिकदृष्ट्या घटस्फोट परवडणारा असला तरी तो भावनिकदृष्ट्य़ा परवडणारा आहे का? हेदेखील बघितलं जातं. अनेकांना जोडीदाराचं वागणं जाचतं, पण जोडीदाराशिवाय जगणंही अनेकांना नकोसं वाटतं, माणसांत, कुटुंबात जगण्याची आस असते. त्यामुळे घटस्फोट घेताना ही भावनिक बाजूही महत्त्वाची असते. 
पन्नाशी आणि साठीच्या टप्प्यात परिस्थितीचा योग्य अंदाज घेण्याची, योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता आलेली असते. त्यामुळे जेव्हा वयाच्या या टप्प्यात घटस्फोट घेतला जातो तेव्हा तो संपूर्णपणे त्या व्यक्तींचा वैयक्तिक निर्णय असतो. पण तरीही या टप्प्यात घटस्फोटाचा निर्णय घेताना इतर सर्व गोष्टींपेक्षा आर्थिकदृष्ट्या घटस्फोट घेणं आपल्याला खरंच  परवडणार आहे का, हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा असतो.

(जेष्ठ विधिज्ञ)
शब्दांकन : माधुरी पेठक

 

 

Web Title: Is it easy to be live septertate after sixty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.