The curse of missing home because of migration | स्थलांतरितांच्या आयुष्याला वणवणीचा शाप!
स्थलांतरितांच्या आयुष्याला वणवणीचा शाप!

-शुभांगी जगताप-गबाले


कुठलीही सुरक्षा पुरवायला नाकाम ठरलेलं आपलं घर आठवणीत गच्च गुंडाळून बॉर्डर क्रॉस केलेल्या असंख्य निर्वासित दोस्तांमधली एक असलेली नाहीद अफगाणिस्तानातून इथं आलीय.
नाहीद सांगते, ‘जलालाबादमधलं आमचं घर अगदी ऐसपैस आहे. यूकेला आल्यावर पहिल्यांदा शेअरिंग हाउसमधलं घर पाहिलं अन रडूच यायला लागलं. अरुंद खोल्या, कळकटून गेलेल्या भिंती आणि खिळखिळी झालेली दारं. दारात वाढलेलं गवत आणि  साचलेला कचरा. किचन झुरळांनी भरलेलं. एक विचित्र कोंदट वास घरात भरून राहिलेला. त्यात भर म्हणजे ऐन थंडीत बंद पडलेला हीटर. हे पाहिलं आणि इंग्लंडच्या घरांबद्दलचं मनातलं चित्रच विस्कटून गेलं खरंच.
दुस-या  दिवशी आणखी एक इराणची मुलगी राहायला आली तेव्हा दोघींनी मिळून दिवसभरात आधी ते घर घासूनपुसून स्वच्छ केलं.
नंतर एक आफ्रिकन छोट्या बाळासहित राहायला आली. ते बाळ रात्रभर रडायचं अन् अम्हाला झोपच यायची नाही. नॉनव्हेज खायला मला आवडत नाही फारसं. आणि ती आफ्रिकन सतत पोर्क किंवा बीफ शिजवायची. मला तो वास असह्य व्हायचा.तिचा स्वयंपाक होईस्तोवर मी बाहेर रस्त्यावर फिरत रहायचे वेळ घालवायला. पण थंडीत, पावसात ते शक्य नसायचं. आता व्हिसा मिळाला असला  तरी अजून स्वतंत्र  घर मिळालं नाही त्यामुळे शेअरिंगमध्येच राहतेय अजूनही. असं राहणं कितीही नकोसं वाटलं तरी आमच्याकडे पर्याय नाही.
समोर मांडलं जाईल ते स्वीकारणं हाच एक पर्याय. अफगाणच्या आमच्या घरासमोर अंगणात एक उंच ओटा आहे. तिथं संध्याकाळी सगळे गप्पा मारत बसायचो ते आठवतं राहून राहून. आईची, बहिणीची, घराची आठवण आल्याशिवाय इथला दिवसच संपत  नाही. 
सुरुवातीला खूप रडायचे. आता इथल्या तडजोडींची सवय होऊन गेलीय. घरी परत कधी जायला मिळेल का नाही या नुसत्या विचारानंही त्रास होतो. मग तो विचारच टाळत राहते.’ केवळ एका अमेरिकन एनजीओमध्ये काम करते म्हणून तालिबानी धाकातून देश सोडावा लागलेली ही मैत्रीण तिच्या घराच्या आठवणीत कायम अशी अस्वस्थ असते. इथे दम निघत नाही म्हणते. अन् यावर निरुत्तर होत, विषय बदलत मग मी दुसरंच काहीबाही बोलत राहते. 
बहार इराणची. नावाला शोभेलशी बहारदार व्यक्तिमत्त्व असलेली. नेटक्या, आकर्षक ड्रेसअपमध्येच कायम वावरणारी. त्यामुळे आहे त्या वयाच्या मानानं बरीच तरुण भासणारी. हे खरं तर सगळ्याच इराणींचं वैशिष्ट्य म्हणता येईल. पन्नाशी ओलांडलेली ही बहार राजकीय कारणांनी आपला खोमेनीग्रस्त देश सोडून यूकेला आली. तेहरानमधल्या आपल्या टुमदार घराबद्दल, तिच्या दोन मुलांबद्दल खूप काही बोलत असते. 
नाजूक नक्षीदार पर्शिअन क्रोकरी, खास इराणी स्टाइलनं विणलेले मखमली गालिचे अन् इराणचं अस्सल खूशबुदार केशर याबद्दल कौतुकानं सांगत राहते. व्यवस्थित राहण्याची, घर सजवायची मुळचीच आवड असलेली बहार इथली शेअरिंगमधली छोटीशी खोलीही नेटकी, सुबक ठेवायला बघते.
तिच्या तेहरानच्या घराच्या आठवणीत व्याकुळ होते. म्हणते, ‘या शेअरिंग हाऊसमध्ये मनच लागत नाही. त्यामुळे मी चर्चमध्ये रोज जाते, तिथेच जास्त वेळ घालवते. खाण्यापुरतं अन् झोपण्यापुरतंच इथे असते. रोज झोपताना तेहरानमधल्या घरातली माझी बेडरूम आठवतच झोपते. तुमच्या देशात तुम्ही काहीही असा; पण इथे आलात की दिवसेंदिवस तुम्ही फक्त गरीब होत जाता. लोकांनी दिलेली जुनी भांडी, कपडे, घरगुती चीजवस्तू वापरणं सुरुवातीला नकोस वाटायचं. पण याला पर्याय नाही आता. किचन लहान असल्यानं चार-पाच जणींमध्ये पुरेसं होत नाही आणि त्यावरून धुसफूस होत राहते. वेगळ्या संस्कृती, सवयी असलेल्या अनोळखी लोकांसोबत दिवसरात्र जगणं किती कठीण असतं. एकमेकींची भाषा समजत नसल्यानं तर आणखी गैरसमज वाढतात.

 


एकमेकींच्या देशाबद्दल, तिथल्या माणसांबद्दल अनेक पूर्वग्रह मूळचेच डोक्यात असतात ते मग उफाळून वर येतात छोट्या छोट्या गोष्टींतून. आधीच क्लेम अन् पेपर्स क्लिअर होण्याचा ताण असह्य होतो. त्यात या घरातल्या कटकटीची भर पडते.’ स्वत:च्या घरात किती सुखात असतो आपण म्हणत इराणमधल्या तिच्या उंची पर्शियन फर्निचरनं सजलेल्या घराचे फोटो बहार अनेकदा दाखवत असते. तिच्या लाडक्या पर्शियन मांजरीचे, मुलांचे फोटो दाखवत त्यांच्या आठवणीत कासावीस होते.. 
इरिट्रिया हा उत्तर आफ्रिकेतला देश. तो असंख्य स्थानिक भेदांनी चेतलेल्या राजकारणात सध्याला भयंकर उफाळतो आहे. अशाच एका स्थानिक हिंसेचा सामना करून तिथली एकजण तिच्या दोन छोट्या मुलाना आईजवळ ठेवून नव-यासोबत यूकेला आलीय. ती म्हणते, ‘मी तर शरीरानं इथ अन् मनानं माझ्या मुलांनी भरलेल्या घरातच असते. 
रोज त्याना व्हिडीओ कॉलवर पाहिल्याखेरीज माझा दिवस सुरू होत नाही अन् संपतही नाही. बेनिफिटसचे पैसे मी त्यामुळे खाण्यापिण्यावर कमी खर्च करते अन् फोनवर जास्त. बाकी कपडे आणि इतर निकडीच्या वस्तू चॅरिटी वा लोकांकडून मिळतात. जुन्या, इतरानी वापरलेल्या वस्तू वापरण्याची सगळ्याच रेफ्युजींना सवय होऊन जाते हळुहळु. इरिट्रियातलं माझं छोटंसं घर मला खूप आवडतं. कसही असलं तरी ते तुमचं स्वत:चं घर असतं. 
त्याची इथल्या कोणत्याही घराशी तुलनाच होऊ शकत नाही.’ घराच्या दारात बसलेल्या तिच्या दोन लहानग्यांचा फोटो तिने व्हॉट्सअँप डीपीवर ठेवलाय जो ती कधीच बदलत नाही. आपल्या घराची, मुलांची अशी व्हच्यरुअल सोबत तिला इथं बळ पुरवत असावी बहुदा..
एक श्रीलंकन तमिळ मैत्रीणही जाफनाजवळच्या गावात गर्द झाडीनं वेढलेलं तिचं घर अन् शेजारून वाहणारी नदी याबद्दल अगदी आससून बोलते. म्हणते,    ‘लहानपणी भावंडांसोबत त्या नदीवर हुंदडण ही सगळ्यात आवडती गोष्ट होती. शाळेत होते तेव्हा सोडलं गाव नि घर. वीस वर्षं झाली त्याला; पण अजूनही कधीतरी ती नदी स्वप्नात येते. 
त्या दिवशी दिवसभर माझं कशात लक्ष लागत नाही मग. कधी जर गावाला जाणं शक्य झालंच तर आधी नदीला भेटायला जाणार.’ तिला ऐकताना तिची ती न पाहिलेली नदी कितीदातरी नजरेसमोर वाहत राहिली मग. 
सुटलेल्या घराच्या आठवणींचे तुकडे अन् उखडलेली मुळं सोबत घेऊन निवा-याच्या शोधात वणवण करत राहणारी ही विस्थापित माणसं, कुठंच धड रुजता न येण्याचा शापही असा हयातभर वागवत राहतात. त्यांच्यातलाच कुणी एक कवी मनाचा, पॅलेस्टिनीयन भूमीतला महमूद दरवेश मग हा सल असा बेहद खुबीनं नोंदवून जातो . हम जाते है घर की ओर जो बना नही हमारी मांस पेशियों से. इसके शहतूत नही बने हमारी हड्डियो से..

(लेखिका इंग्लंडमध्ये वास्तव्याला असून, निर्वासितांसाठी काम करणा-या  संस्थेशी संलग्न आहेत)

shubhangip.2087@gmail.com

 

Web Title: The curse of missing home because of migration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.