Arguments with spouse after retirement.... Why? | निवृत्तीनंतर जोडीदारासोबत खटके का उडतात? वाद विकोपाला का जातात?
निवृत्तीनंतर जोडीदारासोबत खटके का उडतात? वाद विकोपाला का जातात?

-संज्योत देशपांडे

निवृत्तीनंतरचं सुखाचं आयुष्य अशी कल्पना अनेकांनी केलेली असते. पण जोडीदाराबरोबर जमलं नाही तर मात्र निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं रंगवलेलं चित्र मोडू शकतं.
आता जोडीदारासोबत न जमण्यासारखं हे नातं किंवा ती व्यक्ती  नवीन असते का?
नातं आणि व्यक्ती नवीन नसली तरी निवृत्तीनंतरचा दिनक्रम, निवृत्तीनंतरची परिस्थिती वेगळी असते. त्याच्याशी जुळवून घेता आलं नाही तर जोडप्यांमध्ये वाद होऊ शकतात.
नोकरी सुरू असते तेव्हा एक दिनक्रम ठरलेला असतो.   एरवी धावपळीत, एक एक जबाबदारी पार पाडत नवरा बायको एकमेकांच्या स्वभावाशी तडजोड करत, एकमेकांना सहन करत पुढे जात असतात.मात्र जोडीदार किंवा नवरा बायको दोघंही निवृत्त झाले की मात्र त्यांचा सर्वात जास्त वेळ हा घरात जातो. जोडीदाराचा कधी नव्हे तो सहवास जास्त मिळतो. मुलं स्वतंत्र झालेली असतात. आपआपल्या कामात गुंतल्यानं ती घरी कमी आणि बाहेर जास्त असतात. त्यामुळे याच दरम्यान जोडीदारातले दोष त्रास द्यायला लागतात. हे दोष वैताग देतात. त्यामुळे चिडचिड, संताप होतो. वाद होतात. सतत भांडणं होतात. 
काटेकोरपणा हा गुण असलेली एक व्यक्ती निवृत्त होते तेव्हा तिचा हाच गुण घरात बायकोसाठी मात्र दोष ठरतो. कारण घरातही तोच काटेकोरपणा सतत बायकोकडून अपेक्षिला गेल्यानं बायको वैतागते. आणि वाद होतात. नोकरीतलं पद, त्या पदाला मिळणारा मान हे सर्व नोकरी  संपल्यानंतर संपतं मात्र ते स्त्री किंवा पुरूष यांच्याकडून स्वीकारलं जात नाही. ते घरात आपल्या जोडीदाराकडून तीच अपेक्षा करतात. आणि जेव्हा हवं ते मिळत नाही तेव्हा त्रागा करतात. घरातल्यांना जीव नकोसा करतात. पण म्हणून आम्हाला वेगळं व्हायचं आहे असं काही त्यांना वाटत नसतं. घटस्फोट घेण्याचा विचार आहे म्हणून जोडपी समुपदेशकांकडे येत नसतात. मुळात दोघांमधील एका व्यक्तीच्या वागण्यातल्या दोषावर उपाय शोधण्यासाठी म्हणून ती येतात. कधी कधी नवरा बायको एकत्र येतात. तर कोणी स्वतंत्र येऊन समुपदेशकांना भेटतात. एका विशिष्ट प्रश्नावर  किंवा समस्येवर बोलताना निवृत्तीच्या टप्प्यातल्या जोडप्यांच्या नात्यातला हा  विसंवाद समोर येतो.
एकमेकांशी जुळवून न घेता येणं हेच या नात्यातल्या विसंवादाचं कारण.  तीस चाळीस वर्ष नोकरी झालेली असते. आयुष्याचा एका मोठा अवकाश उद्देश साध्य करण्यात गेलेला असतो. त्यादरम्यान पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं असतं. व्यक्तिमत्त्वात, सवयीत बदल झालेले असतात. पण नोकरीमुळे मिळणा-या मर्यादित सहवासातून हे बदल लगेच दिसत नाहीत.  किंवा एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वातले दोष नेहेमीच्या धावपळीत झाकले जातात. पण निवृत्तीनंतर मात्र ते दिसायला लागतात. बोचायला लागतात. त्रास द्यायला लागतात. त्यातूनच विसंवाद वाढतो. 
लग्नं तुटतंय हा या जोडप्यांचा प्रश्नच नसतो. हे नातं अवघड झालंय. किंवा जोडीदाराचं वागणं सहन होत नाहीये कसं वागू हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. जोडीदारासोबतच स्वत:चं आयुष्य या टप्प्यात महत्त्वाचं झालेलं असतं.  नवरा नोकरी करत असतो . तिथे त्याची विशिष्ट पोझिशन असते. तिथे मिळणारा आदर मान वेगळा असतो. तिथला रूबाब वेगळा. नोकरीमुळे त्याला असलेल्या सवयी वेगळ्या पण निवृत्तीनंतर याच सगळ्या गोष्टींची अपेक्षा घरात केली जाते. मुलांकडून, सुनांकडून , जोडीदाराकडून आपल्याला तशीच वागणूक मिळावी ही त्यांची अपेक्षा असते. पण ते होत नाही तेव्हा चिडचिड होते. घरातल्यांशी वाद होतात. 
मुळात नोकरीच्या काळात घरातल्यांनी विशेषत: बायकोनं बरंच सांभाळून घेतलेलं असतं. मात्र सांभाळून घेताना, सहन करताना तीही थकून गेलेली असते. जोडीदाराबरोबर तडजोड करून घेण्याची तिची क्षमताही संपलेली असते. कधी कधी यातून डिप्रेशनसारख्या समस्या निर्माण झालेल्या असतात. अशीच मानसिकता पुरूषांचीही बायकोच्या वागण्यानं झालेली असू शकते. या परिस्थितीचा कंटाळा आलेला असतो. आता सहन होणारच नाही म्हणून मग काही जोडपी या टप्प्यातही घटस्फोटाचा निर्णय घेतात.  रितसर वेगळी होतात आणि स्वतंत्र आयुष्य जगतात. काही घटस्फोट न घेताच परस्पर सहमतीनं वेगळी राहातात. तर काही एकाच घरात दोन अनोळखी माणसं होऊन राहण्याचा निर्णय घेतात. 
जोडीदाराच्या सवयींचा, स्वभावाचा, वागण्या बोलण्याचा , त्यांच्यातल्या गुण दोषांचा लग्नाच्या नात्याच्या गुणवत्तेवर काय परिणाम होतो यावर पन्नाशी साठीतल्या जोडप्यांचं सहजीवन अवलंबून असतं. नात्याची गुणवत्ता घसरली की मग सोबत राहाणं, सांभाळून घेणं, तडजोड करणं सगळंच अशक्य होतं. 

(मानसोपचार तज्ज्ञ )
शब्दांकन :
माधुरी पेठकर

Web Title: Arguments with spouse after retirement.... Why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.