Naal Marathi Movie Review : प्रेक्षकांशी 'नाळ' जोडणारा चित्रपट

By प्राजक्ता चिटणीस | Published: November 16, 2018 03:12 PM2018-11-16T15:12:20+5:302023-09-26T19:17:39+5:30

नाळ या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, देविका दफ्तरदर, नागराज मंजुळे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Naal Marathi Movie Review | Naal Marathi Movie Review : प्रेक्षकांशी 'नाळ' जोडणारा चित्रपट

Naal Marathi Movie Review : प्रेक्षकांशी 'नाळ' जोडणारा चित्रपट

ठळक मुद्देनाळ या चित्रपटाचे लोकेशन आणि सिनेमॅटोग्राफी इतकी अप्रतिम आहे की हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्यात खरी मजा आहेश्रीनिवास, देविका, नागराज या सगळयांनी आपल्या भूमिका चोखपणे पार पाडल्या आहेत.  श्रीनिवासच्या चेहऱ्यावरील निरागस भाव तर प्रेक्षकांचे मन जिंकतात. सुधाकर यांची दिगदर्शन करण्याची पहिली वेळ आहे असे चित्रपट पाहताना कुठेच जाणवत नाही.
Release Date: November 16,2018Language: मराठी
Cast: श्रीनिवास पोकळे, देविका दफ्तरदर, नागराज मंजुळे
Producer: नागराज मंजुळेDirector: सुधाकर रेड्डी यंकट्टी
Duration: 2 तासGenre: नाटक
लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस

लहान मुलांचे एक वेगळेच विश्व असते आणि ते आपल्या विश्वात रममाण असतात. आई वडील आपल्या जवळ असल्यावर लहान मुलांना नेहमीच सुरक्षित असल्यासारखे वाटते. पण हेच आई वडील आपले नाहीत, आपण दत्तक आहोत हे कळल्यावर एका लहान मुलाची काय अवस्था होते हे आपल्याला आजवर अनेक हिंदी चित्रपटात पाहायला मिळाले आहे. नाळ या चित्रपटात देखील अशाच अवस्थेतून जाणाऱ्या एका छोट्या मुलाची कथा पाहायला मिळते. ही कथा आजवर आपण अनेकवेळा ऐकली असली तरी या चित्रपद्वारे ती खूपच वेगळ्याप्रकारे मांडण्यात आलेली आहे.  

चैत्या (श्रीनिवास पोकळे) एका छोट्या गावात आई (देविका दफ्तरदार) वडील (नागराज मंजुळे) आणि आजी सोबत राहत असतो. तो आई, वडील, आजी यांचा प्रचंड लाडका असतो. त्याचे कुटुंब हेच त्याचे जग असते. गावातल्या मुलांसोबत मस्ती करणे, नदीत खेळणे ही त्याची आवडती कामे... एखाद्या लहान मुलाप्रमाणेच तो आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत आपल्या आयुष्यात रममाण असतो. पण एक दिवस त्याच्या घरी त्याचा एक मामा (ओम भुतकर) येतो. या मामला त्याने कधीच पाहिलेले नसते. या मामाकडून त्याला कळते की, त्याचे आई वडील हे त्याचे खरे पालक नसून त्यांनी त्याला दत्तक घेतले आहे, हे कळल्यावर त्या चिमुकल्याच्या मनाची काय घालमेल होते हे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी खूप छान प्रकारे मांडले आहे.

नाळ या चित्रपटाचे लोकेशन आणि सिनेमॅटोग्राफी इतकी अप्रतिम आहे की हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्यात खरी मजा आहे. सुरुवातीला चित्रपट थोडासा संथ वाटत असला तरी नंतर चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. चित्रपटात सगळ्याच कलाकारांनी अतिशय सहजपणे अभिनय केला आहे. श्रीनिवास, देविका, नागराज या सगळयांनी आपल्या भूमिका चोखपणे पार पाडल्या आहेत.  श्रीनिवासच्या चेहऱ्यावरील निरागस भाव तर प्रेक्षकांचे मन जिंकतात. अनेक दृश्यात संवाद नसताना देखील देविकाने तिच्या डोळ्यातून, हावभावतून केलेला अभिनय अप्रतिम आहे. चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा खूपच चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत.  जाऊ दे न वं हे गाणे ऐकायला मस्त वाटते. सुधाकर यांची दिगदर्शन करण्याची पहिली वेळ आहे असे चित्रपट पाहताना कुठेच जाणवत नाही. केवळ काही दृश्य चित्रपटात पुन्हा पुन्हा येत असल्याचे जाणवते. तसेच चित्रपट सुरुवातीला आणि शेवटाला जाताना थोडा संथ होतो. चित्रपटाचे संवाद देखील चांगले आहेत. चित्रपटाच्या शेवटी दिग्दर्शकाने सगळ्या गोष्टी संपूर्णपणे उलगडून न सांगता कोणत्याही संवादाशिवाय चित्रपटाचा आशय लोकांपर्यंत पोहोचवला आहे. यासाठी दिग्दर्शकाचे करावे तितके कौतुक कमी आहे. हा शेवट मनाला नक्कीच भिडतो.

Web Title: Naal Marathi Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.