ValentineDay2018 : गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची काय असतात वैशिष्ट्ये, विचार करुन द्या आवडत्या व्यक्तीला गुलाब

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 07:36 PM2018-02-06T19:36:47+5:302018-02-06T20:00:26+5:30

वेगवेगळ्या गुलाबांच्या वेगवेगळ्या रंगांना त्यांचं आपापलं महत्त्व आहे. ते जाणूनच द्या आपल्या मनातल्या व्यक्तीला गुलाब.

ValentineDay2018: various roses and their importance on occassion of Rose Day | ValentineDay2018 : गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची काय असतात वैशिष्ट्ये, विचार करुन द्या आवडत्या व्यक्तीला गुलाब

ValentineDay2018 : गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची काय असतात वैशिष्ट्ये, विचार करुन द्या आवडत्या व्यक्तीला गुलाब

Next
ठळक मुद्देभारतासह सध्या जगभरात व्हॅलेंटाईन वीकची धमाल आहे. बाजारपेठा आणि  फुलबाजारांतुन एक फेरफटका मारला की याचा प्रत्यय येतो. कॉलेज आणि गिफ्ट शॉपमध्येसुध्दा यादृष्टीने तयारी सुरु केलेली दिसते. मित्र-मैत्रिणी एकमेकांना तसंच आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देतात. तुम्हालाही जर या रोझ डेला कुणाला गुलाब देऊन आपल्या मनातल्या भावना मांडायच्या असतील, तर आम्ही तुमची मदत करु.

मुंबई : भारतासह सध्या जगभरात व्हॅलेंटाईन वीकची धमाल आहे. बाजारपेठा आणि  फुलबाजारांतुन एक फेरफटका मारला की याचा प्रत्यय येतो. कॉलेज आणि गिफ्ट शॉपमध्येसुध्दा यादृष्टीने तयारी सुरु केलेली दिसते. ७ फेब्रुवारीपासून रोझ डेसोबत सुरु होणारा हा व्हॅलेंटाईन वीक १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डेला संपतो. विशेषत: किशोरवयीन आणि त्यातही शहरी मुलांमध्ये या दिवसाची जास्त क्रेझ दिसून येते. हल्ली पाश्चिमात्य संस्कृतींचा म्हणा किंवा सोशल मीडियाचा प्रभाव म्हणा, पण गावाकडच्या मुलांमध्येही या आठवड्याची  झिंग दिसून येते.

७ फेब्रुवारीला रोझ डे असल्याने यादिवशी मनाने किंवा वयाने तरुण असलेले एकमेकांना गुलाब देतात. मित्र-मैत्रिणी एकमेकांना तसंच आपल्या शिक्षकांना गुलाब देतात. ऑफीस सहकारी एकमेकांना गुलाब देतात. ट्रेनमधला रोजचा प्रवास करणाऱ्या ग्रुपमध्येही हे दिवस साजरे केले जातात. तुम्हालाही जर या रोझ डेला कुणाला गुलाब देऊन आपल्या मनातल्या भावना मांडायच्या असतील, तर आम्ही तुमची मदत करु. कारण आपल्याला माहीत आहे की प्रत्येक रंगाचं एक वैशिष्ट्य असतं. तसंच प्रत्येक गुलाबाचंही वैशिष्ट्य असतं. तर यापैकी तुम्हाला नक्की कोणती भावना आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करायची आहे ते ठरवा आणि आपल्या मनातल्या व्यक्तीला त्या रंगाचं गुलाब द्या.

१) लाल गुलाब - प्रेम आणि प्रणय

अर्थात लाल रंगाचं गुलाब प्रेम आणि जबर आकर्षणाचं प्रतिक मानलं जातं. गेल्या हजारो वर्षांपासून ते आतापर्यंत आणि याहीपुढे कायमच प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब सर्वात योग्य मार्ग मानला जातो. तरुणाई एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करताना लाल रंगाचं हे गुलाब देतात. जर तिने ते स्विकार केलं तर तो मुलगाही खुश होतो. लाल गुलाब आत्मियता, बोल्डनेसचं प्रतिक असतो. तसंच एखाद्या जोडप्यातील बाँडींगसुध्दा या गुलाबातून दिसतं. जर या रोझ डेला त्याला किंवा तिला आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवायच्या असतील तर लाल गुलाब किंवा त्याचाच बुके घेऊन आपल्या आवडत्या व्यक्तीला.  

२) पिवळं गुलाब - निखळ मैत्री आणि ऊर्जा

पिवळीधम्मक गुलाबाची फुलं मैत्रीचं प्रतिक असतात. व्हॅलेंटाईन आठवडा प्रेमाने साजरा करताना त्यात रोमान्सच असणं आवश्यक नाहीये. ते प्रेम मैत्री, आई-वडील, मित्र-मैत्रिणी यांच्यातलंसुध्दा असु शकतं. गुलाबाचं पिवळं फुल ऊर्जा, आशा-आकांक्षा, मैत्री आणि आनंदाची बरसात करतात. त्यामुळे या व्हॅलेंटाईन्स वीकला नव्या मैत्रीची सुरुवात करायची असेल तर हे पिवळं गुलाब तुमची मदत करु शकतं.

३) जांभळं गुलाब - पहिल्या नजरेत झालेल्या प्रेम

पहिल्या नजरेत झालेल्या प्रेमाचं प्रतिक म्हणून जांभळ्या गुलाबाला मानलं जातं. पहिल्या नजरेत प्रेम तसं क्वचितच होतं आणि जांभळ्या रंगातली गुलाबसुध्दा तितकीच दुर्मिळ असतात. त्यामुळे आपल्या जरा जास्तच खास व्यक्तीला खास फिलींग आणून देण्यासाठी हे गुलाब देऊ शकता. या फुलासारख्या खास भावना आपल्या समोरच्या व्यक्तीलाही वाटाव्या, म्हणून हे गुलाब देऊ शकता.

४) सफेद गुलाब - शुध्दता आणि शांतीचं प्रतिक

पांढरं गुलाब स्वच्छतेचं, शुध्दतेचं आणि शांतीचं प्रतिक मानलं जातं. तसंच परिपुर्णतेचं, चांगलेपणाचं आणि निष्पापतेचं प्रतिक असतं. काही लग्नांमध्ये या पांढऱ्या गुलाबांचा वापर नव्या सुरुवातीचं प्रतिक म्हणून केला जातो. तसंच ते विश्वास, शांती आणि सत्याचं प्रतिक आहे. जर कुणासोबत नवी सुरुवात करायची असेल किंवा दोघांच्या नात्यात सत्यता आणि शांती आणायची असेल तर हे व्हाईट रोझ तुम्ही त्यांना देऊ शकता.

५) केशरी गुलाब - प्रबळ इच्छाशक्ती

केशरी रंग पिवळ्या व लाल रंगांनी मिळून बनलेला असल्याने त्याच्यात पिवळ्या रंगांची उर्जा आणि लाल रंगातली प्रचंड आवडसुध्दा समाविष्ट असते. या रंगात आनंद, उर्जा, आकर्षण, तीव्र इच्छाशक्ती ही प्रतिकं मानली जातात. जर कुणासाठी असलेली आवड आपल्याला त्यांना दाखवून द्यायची असेल तर त्याला किंवा तिला हे गुलाब देता येईल.

६) गुलाबी गुलाब - कृतज्ञता आणि कौतुक

गुलाबी रंग तर प्रेमाचा आणि रोमान्सचा अधिकृत रंग मानला जातो. हा सुंदर रंग प्रेमाच्या खुणांना जास्त अधोरेखित करतो. एखाद्या व्यक्तीविषयीची कृतज्ञता आणि कौतुक या रंगाच्या गुलाबातून व्यक्त करता येतं. लावण्य, आकर्षकपणा आणि डौलदारपणाचं प्रतिक म्हणूनही हे गुलाब आपल्या आवडत्या व्यक्तीला देता येईल.

७) हिरवं गुलाब - समृध्दी आणि संपन्नता

हिरवा रंग आरोग्य, संपन्नता आणि समृध्दीचं प्रतिक मानलं जातं. मात्र थोड्या वेगळ्या हिरव्या रंगात जळकुटेपणाची चिन्ह असल्यानं तो हिरवा रंग दूर ठेवला जावा. जर तुम्हाला कुणाला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही त्यांना हिरव्या रंगाच्या गुलाबांचा गुच्छ देऊ शकतो.

अशाप्रकारे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबांची प्रतिकं आणि त्यांचं आपापलं महत्त्व सांगितलं आहे. आता तुम्ही ठरवा तुम्हाला कोणत्या व्यक्तीला यापैकी कोणतं गुलाब द्यायचं आहे. कारण त्यानुसार ठरणार आहे की यावर्षीचा तुमचा व्हॅलेंटाईन्स डे सिंगल जाणार की तुमचा पार्टनरसोबत असणार. 

Web Title: ValentineDay2018: various roses and their importance on occassion of Rose Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.