जेव्हा कुणी प्रेमात असतं तेव्हा सतत हे प्रयत्न केले जातात की, पार्टनर कोणत्या गोष्टीमुळे नाराज होऊ नये. तसेच सतत पार्टनरसोबत बोलणे, त्यांना गिफ्ट देणे, साथ हवीहवीशी वाटणे, काळजी वाटणे ही प्रेमाची सामान्य लक्षणे आहेत. पण अशात हेही लक्षात घेतलं पाहिजे की, ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला तुमचा पूर्ण वेळ घालवायचा आहे. त्या व्यक्तीलाही तसंच तुम्हाला वाटतंय तसं वाटतं का? जर नसेल तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. अशी स्थिती कशी ओळखायची हे सांगणारे काही संकेत खालीलप्रमाणे आहेत.
नेहमी तुम्हीच पुढाकार घेता?
जेव्हाही बोलायचं असेल तेव्हा तुम्हीच आधी पुढाकार घेता की, समोरची व्यक्ती सुद्धा असं करते? फोनवर बोलायचं असेल किंवा मेसेज करणं असेल तुम्हीच पहिल्यांदा करत असाल. तसेच तुम्ही मेसेज किंवा फोन केला नाही तर तुमच्यातील बोलणं बंद होतं का? असं होत असेल तर तुम्ही वेळीच याचा विचार करायला हवा. असं का होतंय याचं कारण शोधायला पाहिजे.
तुम्ही त्यांची प्राथमिकता नाही
कधी असं झालंय का की, समोरची व्यक्ती नेहमी त्यांच्या किंवा तिच्या सुविधेनुसार भेटते. तसेच आधीच तुमचं भेटण्याचं प्लॅनिंग झालं असेल आणि तरी सुद्धा तुमचा/तुमची पार्टनर मित्रांसोबत पार्टीला गेलाय. तसेच वेळेवर प्लॅन बदलला असेल तर तेही तुम्हाला न सांगणे. या सर्व गोष्टींवरून हे लक्षात येतं की, तुमचं भलेही त्या व्यक्तीवर प्रेम असेल पण त्या व्यक्तीची प्राथमिकता वेगळी आहे.
रिलेशनशिपमधील समस्या
प्रत्येक नात्यात काहीना काही समस्या असतातच. अनेकदा असं होतं की, तुमच्यात काही भांडण होतं. पण अशात नेहमी चूक तुमची नसताना तुम्हीच भांडणं मिटवण्यासाठी पुढाकार घेता का? पार्टनरची चूक असूनही माफी तुम्हीच मागता आणि समोरची व्यक्ती याकडे दुर्लक्ष करते. असं होत असेल तर चित्र स्पष्ट आहे.
प्रेमाबाबत प्रश्न उपस्थित होतो?
वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या अडचणी दिसत असतील आणि तो किंवा ती तुमच्या प्रेम करते की, नाही असा प्रश्न पडत असेल, तसेच तुमचा पार्टनर त्याच्या किंवा तिच्या भावना कधीच व्यक्त करत नसेल तर हे नातं एकतर्फी आहे हे समजून घ्या.
तुमचा पार्टनर तुम्हाला समजून घेतो का?
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या छोट्या-मोठ्या सर्वच गोष्टींची काळजी घेतो. त्या व्यक्तीला चांगल्याप्रकारे समजून घेण्याचा सतत प्रयत्न करतो. त्यांचं बोलणं ऐकतो. जर तुमच्या पार्टनरमध्ये यातील काहीच दिसत नसेल तर हे नातं मुळात खोटं नातं आहे.