आजच्या सोशल मीडियाच्या काळात विवाहबाह्य संबंधांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पूर्वीच्या काळी चिठ्ठ्यांवर चालणारी प्रेम प्रकरणे आता इन्स्टंट संपर्क साधता येत असल्याने फोफावत चालली आहेत. पतीचे घराबाहेर अफेअर, पत्नीचे पती बाहेर गेल्यावर अफेअर असे अनेक रिल्सही आपण नेमही या सोशल मीडियावर पाहत असतो. अनेकदा पत्नी पती घरी आला की त्याचा मोबाईल तपासत असते, त्याला कोणी मेसेज केला, कोणी कॉल केला आदी अनेक गोष्टींतून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असते. आपले लग्न टिकविण्यासाठी हे सारे ठीक आहे, असे त्यांचे म्हणणे असते. परंतू, जर पत्नीचा मोबाईल पतीने तपासला तर मात्र त्यांना चालत नाही. असाच एक प्रकार घडला आहे. पत्नीचा मोबाईल चेक करणाऱ्या पतीराजाला लाटण्याचा प्रसाद मिळाला आहे.
कानपूरच्या बिठूर भागातील एका व्यक्तीला पत्नीवर संशय होता. यामुळे तो तिचा मोबाईल गुपचूप तपासत होता. काही सापडत नव्हते म्हणून त्याने पत्नीच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग करणारे अॅप इन्स्टॉल केले. काही दिवस गेले, पती नजर ठेवून होता. पत्नी कोणाशी बोलते ते त्याला समजत होते. परंतू, एक दिवस भांडाफोड झाला. पत्नीला या अॅपबाबत माहिती झाली. तिने पतीराजाला लाटण्याने चोप दिला.
हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर पतीराजांनी पोलिसांत धाव घेतली. तिथेही तिने पोलिसांनाच घरी घडलेल्या पिक्चरचा ट्रेलर दाखविला. पोलिसांच्या काय ते लक्षात आले आणि त्यांनी दोघांनाही समजावून घरी पाठवून दिले.
हे पती पत्नी एका भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या जवळच मंधाना पोलीस ठाणे होते. हा तरुण एका फॅक्टरीमध्ये कामाला जात होता. तो जेव्हा कामावर जायचा तेव्हा पत्नी कोणाशीतरी फोनवर बोलत असायची. त्याने जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा बहुतांशवेळा तिचा फोन बिझी लागत होता. यामुळे त्याला आपल्या पत्नीचे लफडे सुरु असल्याचा संशय आला होता. यामुळे त्याने मित्राच्या मदतीने तिच्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग अॅप इन्सटॉल केले. पत्नीला याची खबर मिळाली नाही. ती पती कामावर गेल्यावर फोनवर बोलत राहिली.
एके दिवशी पती कामावरून घरी आला तेव्हा त्याने मोबाईल घेतला आणि टेरेसवर गेला. तिथे तो पत्नीचे कॉल रेकॉर्डिंग ऐकू लागला. इकडे पत्नीला तिचा मोबाईल सापडत नव्हता. म्हणून ती शोधत शोधत टेरेसवर आली. तर पतीराज मोबाईलमधील तिचे रेकॉर्डिंग ऐकत असल्याचे दिसले. मग काय तशीच तडक खाली गेली आणि लाटण्याने पतीला धू धू धुतले.