‘तुला स्वयंपाक जमतो का?’ पाहण्याच्या कार्यक्रमात मुलगी विचारते मुलाला प्रश्न. एका विवाहमंडळाच्या संकेतस्थळानं केलेलं सर्वेक्षण हाच बदल सांगतोय!
By Admin | Updated: June 9, 2017 18:51 IST2017-06-09T18:51:22+5:302017-06-09T18:51:22+5:30
पाहण्याच्या कार्यक्रमात स्वयंपाक जमतो का हा प्रश्न आता मुलं मुलींना विचारू लागली आहेत. ही गंमत वाटते पण हा बदल आहे.

‘तुला स्वयंपाक जमतो का?’ पाहण्याच्या कार्यक्रमात मुलगी विचारते मुलाला प्रश्न. एका विवाहमंडळाच्या संकेतस्थळानं केलेलं सर्वेक्षण हाच बदल सांगतोय!
- सारिका पूरकर-गुजराथी
लग्न करायचं म्हटलं की पूर्वी कांदे-पोह्याचा कार्यक्रम घरोघरी होत असे. मुलगी डोक्यावर साडीचा पदर घेऊन अदबीनं नवऱ्या मुलासमोर बसत. सासरच्या लोकांनी विचारलेल्या जेमतेम एक-दोन म्हणजे शिवण-टिपण करते का? नाव काय तुझं? आणि स्वयंपाक येतो का? अशा प्रश्नांची उत्तरं दिली की ‘जाऊ द्या तिला आत’ असं म्हणत तिची रवानगी आतल्या खोलीत होत असे. या जेमतेम १५-२० मिनिटांच्या संवादानंतर जवळपास ८० टक्के विवाह पक्के होत असत.
आता मात्र काळ झपाट्यानं बदलला आहे. सोशल मीडिया, व्हॉट्स अॅप, आॅनलाईन विवाह मंडळं, लिव्ह इन रिलेशनशीप अशा माध्यमातून आयुष्याचा जोडीदार निवडला जातोय. हरप्रकारे मुलगा-मुलगी एकमेकांची चाचपणी करताना दिसतात. बॅँक बॅलेन्सपासून तर बारीक-सारीक आवडीनिवडी तपासल्या जातात. तेव्हा कुठे एकमेकांना होकार कळवला जातोय. जनरेशन नेक्स्टचा हा फंडा खूपच भारी आहे.
एका आॅनलाईन विवाहमंडळाच्या संकेतस्थळानं नुकतंच एक सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणाचं औचित्य होते ते म्हणजे या संकेत स्थळानं त्यांच्या माध्यमातून सुमारे ५० लाख मनांना लग्नाच्या रेशीमगाठीत अडकवलं आणि ही लग्नं यशस्वीही झाली आहेत असा दावा या संकेतस्थळानं केला आहे. या गोष्टीचं सेलिब्रेशन म्हणून त्यांनी एक सर्वेक्षण केलं. ते करताना सर्व यशस्वी जोडप्यांशी यानिमित्तानं संवाद साधण्यात आला. या आॅनलाईन सर्वेक्षणात ६८०० पेक्षा जास्त मतं नोंदवली गेली. त्यापैकी ४७ टक्के महिला आणि ५३ टक्के पुरुषांची मतं होती. २५ ते ३४ वर्षे वयाची ही भारतीय जोडपी होती.
संवादासाठी काही प्रश्न होते.
नेमकं काय कारण होतं की, तुम्ही यांना हो म्हटलं?
‘बायकांना नेमकं काय हवं असतं पुरूषांकडून? ’ हा सध्या वैश्विक चर्चेचा गहन प्रश्न बनला आहे. बाईचं मन म्हणजे सागरापेक्षा खोल, तिचा थांगपत्ताच लागत नाही असं नेहमीच म्हटलं जातं. म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्नही या माध्यमातून करण्यात आला. ते नेमकं काय कारण होतं की, तुम्ही यांना हो म्हटलं? अशा स्वरूपाचा हा प्रश्न होता. अर्थात नवरा आणि बायको, दोघांनाही हा प्रश्न विचारण्यात आला.
होकार देण्याआधी एकमेकांना काय विचारलं?
सर्वेक्षणादरम्यान जेव्हा दोघांनाही विचारण्यात आलं की लग्नाला होकार देण्याआधी कोणते तीन महत्वाचे प्रश्न तुम्ही एकमेकांना विचारले होते,
नवऱ्या मुलीनं विचारलेले तीन प्रश्न होते..
1) तुम्ही संयुक्त कुटुंबात राहतात की विभक्त? हा प्रश्न विचारणाऱ्या महिलांची टक्केवारी होती ३६ टक्के.
2) तुम्ही मला माझ्या करिअरसाठी पाठिंबा देणार का? हा प्रश्न विचारणाऱ्या महिलांची टक्केवारी होती ३० टक्के.
आणि आश्चर्यकारक विचारला गेलेला तिसरा आणि महत्वाचा प्रश्न होता...
3) तुम्हाला स्वयंपाक येतो का? तुम्ही स्वयंपाक करता का? हा प्रश्न विचारणाऱ्या महिलांची टक्केवारी होती २६ टक्के. पूर्वी हा प्रश्न मुलाला नव्हे तर प्रामुख्यानं मुलीलाच विचारला जायचा. आता तोच प्रश्न बूमरॅँग होऊन नवऱ्या मुलावर उलटू लागल्याची ही चिन्हं आहेत,
नवऱ्या मुलानं विचारलेले तीन महत्वाचे प्रश्न
1) तुम्हाला माझ्या परिवारासोबत राहायला आवडेल का? हा प्रश्न विचारणाऱ्या पुरुषांची टक्केवारी होती ३६ टक्के.
2) तुम्ही लग्नानंतर जॉब करणार का? हा प्रश्न विचारणाऱ्या पुरुषांची टक्केवारी होती ३४ टक्के.
आणि तिसरा प्रश्न
3) तुम्हाला स्वयंपाक येतो का? हा प्रश्न विचारणाऱ्या पुरुषांची टक्केवारी होती फक्त १९ टक्के. म्हणजेच महिलांच्या तुलनेत ७ टक्क्यांनी कमी.
मुलीच्या जातीला स्वयंपाक आलाच पाहिजे, पुढे लग्न झाल्यावर कसं होइल बाई तुझं? असे संस्कार लहानपणापासूनच सर्वसामान्य घरात मुलींवर आजही केले जातात. स्वयंपाक करता येत नसेल तर संस्काराच्या नावानं थेट तिच्या आई-वडिलांच्या नावानं उद्धार होतो. लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज मुलीला स्वयंपाक येत नाही ही काही ठिकाणी घटस्फोटाची कारण ठरेपर्यंत प्रकरणं घडतात.
या सर्वेक्षणातील निरिक्षणं मात्रं काळ खरंच खूप पुढे निघून गेल्याचं अधोरेखित करत आहेत. स्वयंपाक, स्वयंपाकघर ही फक्त मुलीची जबाबदारी नाहीये, तर दोघांची आहे, हे सांगणारी ही मतं आहेत. लग्नाळू मुलंही मुलीला आधी तिचं करिअर अपेक्षा हे विचारण्याला प्राधान्य देत आहे. तुला स्वयंपाक येतो का? हा प्रश्न मुलींना प्रामुख्यानं विचारला जात नाही.
लग्नानंतरही स्वयंपाक आला नाही तर एकमेकांना सांभाळून घेत संसार करण्याची जबाबदारीही अनेक घरात दोघांनी उचलली आहे. सर्वेक्षणाची निरिक्षणं नोंदवतांना आॅनलाइन विवाह मंडळाच्या संकेत स्थळानं समाजातल्या या बदलाचं कौतुक करताना हा बदल कायमस्वरूपी टिकून राहायचा असेल तर मुलींनी, मुलीकडच्यांनी आपल्या मतांवर ठाम असण्याची गरज व्यक्त केली आहे. ‘नाही येत माझ्या मुलीला स्वयंपाक पण ती खेळात निपूण आहे’, ‘नाही येत मला स्वयंपाक पण मी बॅँकेत मोठ्या पदावर आहे’, ‘एक स्वयंपाक नाही जमत एवढंच ना पण मी माझा व्यवसाय उत्तरमरित्या कोणाच्याही आधाराशिवाय सांभाळते आहे हे म्हत्त्वाचं नाही का?’ ‘मला स्वयपाक जमला तरच मी यशस्वी हे असं कसं?’ असे प्रश्न मुलीचे आई -वडील, स्वत: मुलगी ठणकावून विचारेल तेव्हा या मतांना आणखी महत्व प्राप्त होईल.