जिल्हा परिषदेची भरती स्थगित

By Admin | Updated: October 16, 2015 22:21 IST2015-10-16T21:56:31+5:302015-10-16T22:21:17+5:30

आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश

Zilla Parishad recruitment adjourned | जिल्हा परिषदेची भरती स्थगित

जिल्हा परिषदेची भरती स्थगित

रत्नागिरी : राज्यात लागू असलेल्या आचारसंहितेमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेतील भरतीला राज्य शासनाकडून स्थगिती देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर हे आदेश जारी झाले आहेत.राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये गट-क आणि गट-ड ची सरळसेवेच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिले होते. त्यानुसार ही भरती आॅनलाईन पध्दतीने करण्यात येत होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेने १८० पदांची भरती घोषित केली होती. त्यामध्ये औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य सेवक (पुरुष/महिला), पर्यवेक्षिका (एकात्मिक बाल विकास सेवा योजना), कंत्राटी ग्रामसेवक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), परिचर, स्त्री परिचर आणि पर्यवेक्षिका आदि पदांचा त्यामध्ये समावेश आहे.
अनेक महिन्यांपासून रखडलेली जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाल्याने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. या भरती प्रक्रियेचे अर्ज आॅनलाईन पध्दतीने भरण्याची अंतिम तारीख ३० आॅक्टोबरपर्यंत होती. ही भरती प्रक्रिया गुरुवार १५ आॅक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली.
सध्या राज्यामध्ये ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका चालू आहेत. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने या निवडणुकांमुळे राज्य शासनाला सर्व जिल्हा परिषदांतील नोकर भरती प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेलाही स्थगिती मिळाली आहे. मात्र, या भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रकही शासनाने जाहीर केले असून २ नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Zilla Parishad recruitment adjourned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.