जिल्हा परिषदेने २५ लाख थकवले
By Admin | Updated: July 7, 2015 23:13 IST2015-07-07T23:13:52+5:302015-07-07T23:13:52+5:30
चिपळूण : पालिकेचे भाडे वसुलीसाठी स्मरणपत्र

जिल्हा परिषदेने २५ लाख थकवले
चिपळूण : शहरातील नगर परिषदेच्या इमारतीत सुरु असणाऱ्या ३ शाळांचे जिल्हा परिषदेकडून थकीत भाडे अद्याप वसूल झालेले नाही. याबाबत संबंधित शाळा व शिक्षण विभागाला वेळोवेळो कळवूनही दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर या शाळांना स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे.चिपळूण नगर परिषदेतर्फे बांधण्यात आलेल्या पाच इमारती जिल्हा परिषदेकडे भाडेतत्त्वावर शाळा चालवण्यासाठी देण्यात आल्या होत्या. त्यापैकी बापट आळी कन्याशाळा, पाग मुला-मुलींची शाळा यांनी थकीत भाडे भरले आहे. उर्वरित वडार कॉलनी शाळा, चिंचनाका नं. १, पेठमाप मराठी व उर्दू या शाळांचे थकीत भाडे नगर परिषद प्रशासनाकडे अद्याप भरण्यात आलेले नाही. थकीत शाळांचे भाडे ठरलेल्या मुदतीत भरण्यात आले नाही तर या शाळा ताब्यात घेण्याचा ठराव मागील झालेल्या सभेत करण्यात आला. मात्र, शाळा सुरु होऊन दुसरा महिना सुरु झाला तरी थकीत शाळांनी अद्याप नगर परिषद प्रशासनाकडे भाडे भरलेले नाही. अंदाजे २५ लाख रुपये भाड्यापोटी नगर परिषद प्रशासनाला येणे बाकी आहे.
थकीत भाडे मिळण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही भाडे भरण्याबाबत कोणतीच हालचाल केली जात नाही. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने संबंधित विभाग व शाळांना पुन्हा स्मरणपत्र पाठवून थकीत भाडे भरण्याबाबत सूचना केली आहे. (वार्ताहर)
थकीत भाडे वसूल कधी होणार
शहरातील तीन शाळांच्या थकीत भाडे वसुलीचा प्रश्न ऐरणीवर असून, गेले अनेक महिने ते वसूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत ते वसूल न झाल्यामुळे परिषद प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे. या शाळांना स्मरणपत्र पाठविण्यात आली आहेत.