जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
By Admin | Updated: May 20, 2015 00:14 IST2015-05-19T22:09:25+5:302015-05-20T00:14:36+5:30
सेवाप्रणालीचे काम अपूर्ण : क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
रत्नागिरी : सेवा प्रणालीचे काम अपूर्ण असल्याने जिल्हा परिषदेच्या ३२०० कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन रखडले आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी अडचणीत आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न होण्याचे प्रमाण वाढले आहे. क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न मिळाल्यास त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मे महिन्याची सुट्टी असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सुट्टीनिमित्त फिरायला बाहेर जातात. तसेच बहुतांश कर्मचारी परजिल्ह्यातील असल्याचे त्यांचे कुटुंबीय गावी जातात. त्यासाठी त्यांना आपल्या वेतनावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणे अवश्यक आहे.
जिल्हा परिषदेचे सेवार्थ कर्मचारी ३२०० आहेत. या कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणालीचे काम गेले कित्येक दिवस सुरु आहे. मात्र, ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे त्यांच्या खात्यावर वेतन जमा करणे प्रशासनाला अडचणीचे होत आहे.
कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळावे, यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष वामन कदम यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना भेटले. त्यावेळी त्यांनीही सेवार्थ प्रणालीमुळेच वेतन रखडलेल्याचे सांगून ते काम पूर्ण झाल्याशिवाय वेतन देण्यात अडचण असल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यासाठी वेतन आणखी किती दिवस रखडणार आहे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावत आहे. वेतन झालेले नसल्यामुळे ऐन सुट्टीत अशा कर्मचाऱ्यांना कुटुंबासाठीही खर्च करणे अवघड बनले आहे.
जिल्हा परिषदेतील हा प्रश्न गेले अनेक महिने गाजत असून याबाबत वेळीच आवाज उठवावा, अशी मागणी करण्यात या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. (शहर वार्ताहर)