विनयभंगप्रकरणी तरुणाला ३ वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:36+5:302021-05-25T04:35:36+5:30
रत्नागिरी : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य करून विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने सोमवारी तीन वर्षे ...

विनयभंगप्रकरणी तरुणाला ३ वर्षांचा कारावास
रत्नागिरी : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य करून विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने सोमवारी तीन वर्षे साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना शहरानजीकच्या भाट्ये परिसरात ९ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ८ वाजण्याचा सुमारास घडली होती. तजमुल जैनुद्दीन भाटकर (३३, रा. भाट्ये, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याच्याविरोधात पीडितेने तक्रार दिली हाेती. या तक्रारीनुसार ९ ऑगस्ट रोजी रात्री ती आपल्या लहान बहिणीला क्लासहून घरी आणण्यासाठी जात होती. त्या वेळी तजमुलने तिच्या पाठीमागून जाऊन गैरकृत्य केले व तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.
याबाबत तिने तक्रार देताच पाेलीस उपनिरीक्षक मुक्ता भोसले यांनी तपास करून तजमुल याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३५४(अ) आणि पोक्सो कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. ९ महिने हा खटला न्यायालयात सुरू होता. सरकारी पक्षातर्फे अॅड. मेघना नलावडे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून सोनाली शिंदे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे ६ ते ७ साक्षीदार तपासून केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी तजमुल याला १ वर्ष शिक्षा व ५ हजार रुपये दंड, तो न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच कलम ७ व ८ नुसार १ वर्ष शिक्षा व १० हजार रुपये दंड, तो न भरल्यास ६ महिने साधा कारावास आणि कलम ११ व १२ नुसार १ वर्ष शिक्षा व १ हजार रुपये दंड, तो न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी एकूण ३ वर्षे साधा कारावास आणि १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.