तरुणांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST2021-03-30T04:18:33+5:302021-03-30T04:18:33+5:30
चिपळूण : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव व युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष फैसल पिलपिले यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या युवक काँग्रेसच्या मेळाव्यात ...

तरुणांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश
चिपळूण : काँग्रेसचे
तालुकाध्यक्ष प्रशांत यादव व युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष फैसल पिलपिले
यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या युवक काँग्रेसच्या मेळाव्यात साजिद
सरगुरोहसह शेकडो सहकाऱ्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्व
कार्यकर्त्यांचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी स्वागत केले.
निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर
रत्नागिरी
: रत्नागिरी जिल्हा शिक्षक मंडळामार्फत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय
निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दोन गटात आयोजित केलेल्या
स्पर्धेत १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. इयत्ता आठवी ते दहावी गटात
मधुमती मयेकर हिने प्रथम, श्रावणी पारकर हिने द्वितीय, आराध्य पाटील हिने
तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप
रत्नागिरी
: लार्सन ॲन्ड टुब्रो कंपनीमार्फत हरचेरी - उमरे येथील महात्मा गांधी शिक्षण
मंदिरातील विद्यार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. हरचेरी
पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र झापडेकर यांच्या
अध्यक्षतेखाली शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
मास्क, सॅनिटायझरचे वाटप
चिपळूण
: शहरातील गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी
देवस्थानच्या शिमगोत्सवानिमित श्री गणेश क्रीडा मंडळातर्फे भाविकांना मास्क
व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा
उपक्रम राबविण्यात आला.
१६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले
लांजा
: तालुक्यात १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत
देण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ग्रामीण,
शहरी भागात आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ऐन
शिमगोत्सवाच्या कालावधीत रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
महावितरणचा इशारा
रत्नागिरी
: महावितरणची थकबाकी वाढत असल्याने थकबाकी वसुली न करणाऱ्या
कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वरिष्ठांकडून देण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे महावितरणने वीजबिल हप्त्याने भरण्याची सवलत दिली होती.
त्यानंतरदेखील वीजबिलाबाबत शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरण कंपनीने अनेक
मेळावे आयोजित केले होते.
विक्रांत जाधव यांचा सत्कार
चिपळूण
: रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा
कुंभार्ली ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच
रवींद्र सकपाळ, उपसरपंच संदीप कोलगे व ग्रामपंचायत सदस्या गायत्री कोलगे,
पूनम रेमजे, दर्शना शिंदे उपस्थित होत्या. यावेळी अध्यक्ष जाधव
यांनी कुंभार्लीमध्ये विकास करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
वाहन चालकांना रस्ता सुरक्षा प्रबोधन
गुहागर
: रस्ता सुरक्षा या शासनाच्या उपक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील अंजनवेल
येथील रत्नागिरी गॅस ॲन्ड पॉवर कंपनीच्या वतीने रस्त्यावरील वाहने
चालविणाऱ्या वाहन चालकांना रस्ता सुरक्षासाठी प्रबोधन करण्यात आले.
अंजनवेल फाटा येथे ये - जा करणाऱ्या वाहनांना थांबवून चालकांना रस्ता
सुरक्षेचे महत्व पटवून देण्यात आले.
सुवर्णकार मंडळातर्फे सत्कार
चिपळूण
: सुवर्णकार मंडळातर्फे ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये
सुवर्णा मिरकर यांनी ७५ वर्षे पूर्ण केली तसेच सुचित्रा कुष्टे यांनी ७०
वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी
मंडळातील सर्व सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.
इनामपांगारी रस्त्याचे भूमिपूजन
दापोली
: जिल्हा परिषद, रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजना २०१९ - २० अंतर्गत
तालुक्यातील इनामपांगारी रस्त्यासाठी १५ लाख रुपये मंजूर झाले असून, या
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते पार पडले.
इनामपांगारी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणारी गैरसोय थांबणार आहे. तसेच या
मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वांनाच दिलासा मिळणार आहे.