आपले काम, आपली स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:12+5:302021-09-05T04:35:12+5:30
आता आपण खुर्चीवर मागे रेललो. क्षणभर डोळे बंद केलेत. एक खोल श्वास घेतलात. आपले खांदे चक्क उशी असलेल्या खुर्चीला ...

आपले काम, आपली स्थिती
आता आपण खुर्चीवर मागे रेललो. क्षणभर डोळे बंद केलेत. एक खोल श्वास घेतलात. आपले खांदे चक्क उशी असलेल्या खुर्चीला टेकून श्वास घेऊन दाबावा. काही क्षण लगेच आपला मानेवर, पाठीवर आणि हातावर येणारा ताण कमी करतो. नंतर डोळे उघडावे. मस्तपैकी हात मानेच्या मागे न्यावे. अर्थात हाताची घडी केलेली असावी. म्हणजेच बोटे एकमेकात गुंतवावी. आता मान थोडी वर करुन हाताच्या घडीवर टेकवावी. आता मानेचा जोर हातावर द्यावा. त्याचवेळेस हातावर मान तोलावी. काही क्षण साधारण पाच ते सात सेकंद असं करावं. बघा संपूर्ण ताण कमी होतो. मान, खांदा अवघडत नाही. ‘एक पंथ और अनेक काज’ कसे ते पहा. हाताची घडी केलीत, बोटे की-बोर्डवरुन बाजूला झाली. म्हणजेच बोटांना आराम शिवाय हाताची घडी करताना घर्षण, म्हणजेच बधिरता, मुंग्या येणं यापासून मुक्तता (कारण एकाच पद्धतीची हालचाल), असं केलं की रक्ताभिसरण होतं. स्नायूगट मोकळे होतात.
नंतर काही क्षणातच तेच हात वर न्यावेत आणि मागे नेऊन हळूहळू दोन्ही बाजूंनी खाली आणावेत. बघा खांदा, मानेचा भाग, मानेच्या बाजूचा भाग यातलं अवघडलेपण एकदम मोकळं होतं, हलकं वाटतं. लगेच ताजेपणा संचारतो. आपण सक्रिय होतो. सततच्या एकाच पोश्चरमध्ये राहिल्यामुळे TRAPETIATIS चा त्रास होत नाही. (मानेच्या मागे, बाजूला आणि खांद्याच्या वर यावरचा भाग) आणि हा त्रास कालांतराने मानेच्या मणक्याच्या दुखण्याची ग्वाही द्यायला लागतो. (Cervical Spandylosis)
प्रशासकीय सेवेत कामाचा ताण जास्त असतो. म्हणून अलिकडे बऱ्याच कार्यालयांत ऑफिस चेअरची पद्धत यायला लागलेली आहे. यावरुन अजून एक अनुभव (तसे अनुभवांची आपल्याकडे खाण आहे.) मी आपल्या सर्वांसाठी शेअर करत आहे. वरील व्यायाम साधारण २२-२३ वर्षांपूर्वी मी एका शासकीय उच्च अधिकाऱ्याला सांगितला. सोबत त्यांना स्लॅण्टींग वाचन आणि लेखन स्टॅण्ड त्यांच्या टेबलवर ठेवायला सांगितला. त्यांनी तो बदल करुन घेतला. त्रास कमी झाला, बरा झाला. आजही वर्षातून एकदा आमच्या वाढदिवसाला फोन येतो. ते हैराण - त्रस्त झाले होते. आज त्यांचं वय ५४-५५ असावं. पण आवर्जून सांगतात, ‘त्रास आता नाहीच!’
अजून एक महत्त्वाचे. संगणक, लॅपटॉप आणि मोबाईलवरुन आज काम वाढलं आहे. मध्येच एक, पाव ते अर्धा मिनीट वेळ काढावा. कुणाच्या लक्षातही येणार नाही. उजव्या हाताने डाव्या हाताची सर्व बोटे आणि डाव्या हाताने उजव्या हाताची बोटांची टोके (Tip of the Fingers) कुरवाळावीत. मस्त व्यायाम आहे. बोटे मजबूत राहतात. मुंग्या येत नाहीत. सुन्न होत नाहीत. रक्ताभिसरण मस्त होतं. तणाव नाहीसा होतो कामाचा. शेवटी आपला कम्फर्ट आपली क्षमता वाढवतो आणि आता एक महत्त्वाचे. आता गणेशोत्सव आलाय. श्री गणेशाचा जयजयकार करत आपण आपला व्यक्तिगत आणि सामाजिक कोविड - १९ संरक्षण कम्फर्ट पाळूया. सर्वजण सुरक्षित राहूया...!
(क्रमश:)
- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी